अकोला

वान प्रकल्पातून नियंत्रित विसर्ग सुरु ,  “सहा दरवाजे उघडले”

अकोट – कुशल भगत

तेल्हारा , दि. १४ :- तालुक्यातील वान (हनुमान सागर) या मोठ्या प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून आज सहा दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. सध्या तीन हजार क्युसेसचा नियंत्रित विसर्ग सुरु असून त्याचा उद्देश पूर व्यवस्थापन हा असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, वान प्रकल्प , ता तेल्हारा जि अकोला ,या मोठ्या प्रकल्पाचे बांधकाम १९७९ मध्ये सुरू होऊन २००१ मध्ये पूर्ण झाले. वान प्रकल्पाचे बांधकाम कोलग्राऊट मेसनरी या प्रकारामध्ये झाले. हा तेव्हाचा या बांधकाम प्रकारातला नाविण्यपूर्ण प्रकल्प होता. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरीता वन जमीन वगळता कुठलीही जमीन संपादित करण्यात आली नाही. वान प्रकल्पाचा एकूण साठा ८३.४६५दलघमी इतका आहे. त्या पैकी ८१.९५५ दलघमी इतका जिवंत साठा व १.५१ दलघमी इतका मृत साठा आहे. प्रकल्पाची एकूण सिंचन क्षमता १९हजार १७७ हेक्टर इतकी आहे. प्रकल्पामुळे तेल्हारा तालुक्यातील ४१ तर संग्रामपूर तालुक्यातील १३गावांना मोठ्या प्रमाणात सिंचनाचा फायदा होतो. प्रकल्पामधून शेगाव ,तेल्हारा, अकोट व ८४ खेडी, जळगाव जामोद ,संग्रामपूर व १४०खेडी या सर्व गावांना पिण्याकरिता पाणी पुरविण्यात येते. वान प्रकल्प तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यासाठी जीवनदायी असून या द्वारे रब्बी व खरीप मध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाकरिता पाणी पुरविण्यात येते. जलसंपदा विभागाच्या काटेकोर नियोजनामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा व पूर परिस्थिती नियंत्रित ठेवण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. गुरुवार दि. ८ऑगस्टपासून या प्रकल्पाचे दार उघडून पूर परिस्थिती टाळण्याकरिता नियंत्रित विसर्ग वान नदी मध्ये सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आज दि. १३रोजी सुद्धा वान प्रकल्पातून सहा दरवाजे विस सेमी ने उघडण्यात आले असून नियंत्रित( तीन हजार क्युसेस) विसर्ग सुरु आहे.

याकरिता जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे व सहायक अभियंता श्रेणी १अनिकेत गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात धरण सुरक्षा लक्षात घेऊन आवश्यक पाणीसाठा ठेवण्याकरिता २४×७ पूरनियंत्रण कक्ष धरण स्थळी कार्यरत आहे.

87 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close