Home मुंबई मजाक केली म्हणून एका वृद्धाने अल्पवयीन मुलास मारून टाकले

मजाक केली म्हणून एका वृद्धाने अल्पवयीन मुलास मारून टाकले

178

अमीन शाह

मुंबई , दि. ०२ :- खोडकर स्वभावाचा १४ वर्षीय मुलगा एका ६८ वर्षीय वृद्ध व्यक्तीची वारंवार चेष्टा करीत असल्याने त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घाटकोपर येथे घडली आहे. चेष्टा करताना चप्पल लपवल्यामुळे बेदम मारहाण केल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गोहिल नावाचा ६८ वर्षीय आरोपी हत्या करण्यात आलेल्या शिवशंभू पवार या १४ वर्षीय मुलाच्या घरापासून गोळीबार रोडवर काही अंतरावरच राहतो. शिवशंभू वारंवार गोहिल याची चेष्टा करीत असे त्यामुळे गोहिलने त्याला अनेकदा शिवीगाळ करीत मारहाण केली होती.

पुन्हा एकदा शिवशंभूनं गोहिलची चेष्टा करताना त्याची स्लिपर लपवली. त्यामुळे गोहिल बराच वेळ त्याची स्लिपर शोधत राहिला. यावर इथंली लहान मुलं त्याला चिडवू लागली. थोड्यावेळानं जेव्हा शिवशंभूनं गोहिलला त्याची स्लिपर परत केली. तेव्हा मात्र चिडलेल्या गोहिलंन शिवशंभूला त्याच्या घरातून बाहेर ओढत आणून आपल्या घरी नेऊन बेदम मारहाण करायला सुरुवात केली. जबर मार बसल्याने शिवशंभू तत्काळ बेशुद्ध झाला.
दरम्यान, ज्या शेजाऱ्यांनी हा प्रकार पाहिला त्यांनी तत्काळ शिवशंभूच्या पालकांना याची माहिती दिली. त्यानंतर ते गोहिलच्या घरी गेले तर तिथं त्यांचा मुलगा फरशीवर निपचीत पडला होता. त्यानंतर त्यांनी तातडीने त्याला महापालिकेच्या राजवाडी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले. तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं.

यानंतर पोलिसांनी या प्रकाराची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस अधिकारी तत्काळ त्याच्या घरी पोहोचले आणि त्यांनी गोहिलला ताब्यात घेतले. त्यानंतर गोहिलवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मृत शिवशंभूचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यामध्ये श्वास कोंडून त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.