ताज्या घडामोडी

देशातील सुमारे चारशे रेल्वे स्थानकांवर चहासाठी मातीचे कुल्हड वापरण्याचा निर्णय – नितीन गडकरी

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नागपूरात स्वयंरोजगार प्रेरणा अभियानाचे उद्‌घाटन संपन्न

नागपूर , दि. 1 :- परंपरांगत लघू उद्योगांना चालना देण्यासाठी आपल्या मंत्रालयाने रेल्वे मंत्रालयासोबत चर्चा करून देशातील सुमारे चारशे रेल्वे स्थानकांवर चहासाठी मातीचे कुल्हड वापरण्याचा निर्णय घेतला असून यामूळे मातीकाम करणाऱ्या कारागिरांना रोजगार मिळेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग जहाज बांधणी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात दिली. केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालया अंतर्गत एम.एस.एम.ई. विकास संस्था नागपूर व स्वयंम्‌ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज वर्धमान नगरस्थित परंपरा लॉन येथे सुशिक्षित बेरोजगारांना एम.एस.एम.ई.च्या योजनाविषयी जागृत करण्यासाठी स्वयंरोजगार प्रेरणा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, तर विशेष अतिथींच्या स्थानी ग्रीनक्रूड व बायोफ्युएल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर व एम.एस.एम.ई. विकास संस्था नागपूरचे संचालक पी.एम. पार्लेवार, स्वयं फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल चव्हाण उपस्थित होते.

आपल्या देशात अगरबत्तीची निर्यात चीन मधून होत असून, यामुळे देशातील अगरबत्ती व्यवसायावर याचा परिणाम होत होता. यावर उपाय म्हणून सरकारने आता अगरबत्तीवर तीस टक्के आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय कालच घेतला यामूळे अगरबत्ती व्यवसाय अधिक किफायतशीर होईल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात एम.एस.एम.ई. क्षेत्राचा वाटा हा 29 टक्के असून याद्वारे 71 हजार कोटी रुपयांची उलाढाल होते व 40 टक्के निर्यात या क्षेत्रातून होत असून आतापर्यंत 11 कोटी लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आता या क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा 50 टक्के, निर्यात 50 टक्के तर उलाढाल दीड लाखापर्यंत वाढविण्यास तसेच येत्या 5 वर्षात 5 कोटी रोजगार एम.एस.एम.ई. क्षेत्रात निर्माण करण्याचे लक्ष्य आपण ठेवले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या स्वयंरोजगार प्रेरणा अभियानात एम.एस.एम.ई. मंत्रालया अंतर्गत येणा-या नागपूर येथील एम.एस.एम.ई. विकास संस्था, खादी व ग्रामीण उद्योग विकास आयोग तसेच महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्था (एमगिरी) वर्धा यांच्यातर्फे राबविल्या जाणा-या योजनांचा लाभ तरुण व महिलांनी घ्यावा व आपली उद्यमशीलता वाढवून आर्थिकदृष्ट्या निर्भर बनावे, असे आवाहनही गडकरी यांनी याप्रसंगी केले.

केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे राबविल्या जाणा-या योजनासंदर्भात मार्गदर्शन करुन त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रेरीत करणे हे या अभियानाचे मुळ उद्दिष्ट आहे. सदर अभियानाप्रसंगी लघू उद्योगाच्या संयत्रांची प्रात्यक्षिके दाखविली गेली. जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामीण औद्योगिक महामंडळ, महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्था (एमगिरी) वर्धा यांच्यातर्फे आर्थिक योजना व उपक्रमासंदर्भात तरुणांना माहिती देण्यात आली. यासोबतच बँक इंडीया, ग्रीनक्रूड व बायोफ्युएल फाऊंडेशन, नागपूर अगरबत्ती क्लस्टर संस्था यांचेही माहितीपर स्टॉल्स कार्यक्रमस्थळी लावण्यात आले होते.

या कार्यक्रमात युवक, महिला बचतगटाच्या सदस्या, स्थानिक लोकप्रतिनीधी उपस्थित होते.

58 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close