प्रशासन

कायदा व सुव्यवस्थेसह निवडणूक तयारीचा निवडणूक आयोगाने घेतला आढावा

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

पुणे , दि. १२ :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा आणि निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी आज पुणे विभागातील जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांकडून पूर्वतयारी व कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

यशदा येथे पुणे विभागातील पुण्यासह सोलापूर, सातारा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे शहर पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई उपस्थित होते.

सिन्हा म्हणाले, गेल्‍या लोकसभा निवडणुकीत पुणे शहरातील मतदानाची टक्‍केवारी कमी होती, यंदाच्‍या विधानसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी मतदारजागृती मोहीम व्‍यापक करण्‍यात यावी, ‘स्‍वीप’ कार्यक्रमांतर्गत सर्व माध्‍यमांचा वापर करण्‍यात यावा. मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी मतदान केंद्रावर खात्रीशीर किमान सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचीही विशेष काळजी घेतली जावी. मतदारांना आपले मतदान केंद्र कुठे आहे, मतदार यादीतील क्रमांक याची माहिती वेळेपूर्वी मिळेल, याची दक्षता घेतली जावी, मतदारांना मतदार चिठ्ठया वेळेपूर्वी उपलब्ध करून दिल्या जाव्यात, असे सांगून निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे सांगितले. एकही मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये, यासाठी खबरदारी घेण्‍याचे निर्देशही त्‍यांनी दिले.

निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनीही मार्गदर्शन केले. ते म्‍हणाले, निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या सर्वांना मतदान करता यावे, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जावी. आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबरच स्थिर संनिरीक्षण पथके, भरारी पथके यांचा सक्षमपणे वापर करण्यात यावा. मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सोलापूर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्‍ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा सादर केला. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

37 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close