नांदेड

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी आरोग्य मित्र किंवा आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा – जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

मजहर शेख

नांदेड , दि. ०८ :- आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी मूळ शिधापत्रिका व आधार कार्ड अथवा अन्य कोणतेही शासनमान्य मुळ ओळखपत्र सोबत घेऊन संलग्नीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांशी अथवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेविषयी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली.

या बैठकीस अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधीकारी प्रतिनिधी डॉ. प्रवीण मुंडे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी डॉ. हर्नालीकर, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच जिल्हा समन्वयक डॉ. दिपेशकुमार शर्मा तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या योजनेंतर्गत लाभार्थी हे सामाजिक आर्थिक जातीय जनगणना 2011 आधारित विशिष्ट निकषांनुसार निवडलेले ठराविक निवडक लाभार्थी कुटुंब असून याचा लाभ कमाल मर्यादा 5 लाख रुपये प्रति कुटुंब प्रति वर्ष घेता येणार आहे. यासाठी सामाजिक आर्थिक जातीय जनगणना 2011 आधारित विशिष्ट निकषांनुसार निवडलेल्या ठराविक निवडक लाभार्थी कुटुंबाच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे नाव यादीत आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी mera.pmjay.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अन्यथा 14555 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. अथवा संलग्नीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांशी संपर्क साधावा.

या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना विविध गंभीर आजारांवर 33 विशेष श्रेणीत 1 हजार 300 उपचार असून त्यामध्ये 839 उपचार पद्धती या खाजगी रुग्णालयात तसेच 461 उपचार हे शासकीय रुग्णालयांतर्गत योजनेच्या नियमानुसार उपलब्ध तज्ज्ञ सुविधांवर पूर्णपणे मोफत उपचाराचा लाभ मिळेल. यामध्ये प्रामुख्याने सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, लहान मुलांचे कर्करोग तसेच मानसिक आजारावरील उपचार आहेत. या योजनेचा लाभ नांदेड जिल्ह्यातील जवळपास 1 लाख 22 हजार 83 कुटुंबांना होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गोल्डन कार्ड असणे आवश्यक आहे. ज्या कुटुंबाची नावे सामाजिक आर्थिक जातीय जनगणना 2011 आधारित विशिष्ट निकषांनुसार निवडलेले ठराविक निवडक लाभार्थी कुटुंब मध्ये आहेत त्यांना हे गोल्डन कार्ड संलग्नीकृत रुग्णालयात मोफत तसेच आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी 30 रुपयामध्ये बनवून दिले जाते.

या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी मूळ शिधापत्रिका व आधार कार्ड अथवा अन्य कोणतेही शासनमान्य मुळ ओळखपत्र सोबत घेऊन संलग्नीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांशी अथवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्याशी संपर्क साधावा. तसेच काही समस्या असल्यास नांदेड येथील जिल्हा रुग्णालयातील प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. दिपेशकुमार शर्मा यांच्याशी (भ्रमणध्वनी नंबर 8275095818) वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.

22 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close