Home महत्वाची बातमी जिल्हा वार्षिक योजनेतून करोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी 11 कोटी 8 लाख रुपयांचा निधी...

जिल्हा वार्षिक योजनेतून करोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी 11 कोटी 8 लाख रुपयांचा निधी वितरित धंनजय मुंडे ,

209

आयसोलेशन वॉर्ड, अधिकचे व्हेंटिलेटर, यंत्रसामग्री, औषधोपचार, पीपीई किट, मास्कसह अनेक बाबींचा समावेश

जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच स्वाराती रुग्णालय कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज

अँड , ताज अहेमद अन्सारी

बीड

बीड जिल्हा वार्षिक विकास योजनेतून कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, अंबेजोगाई येथिल स्वाराती रुग्णालय यासह ग्रामीण रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड, यंत्रसामग्री, व्हेंटिलेटर्स, औषधसाठा आदी उपाययोजनांसाठी ११ कोटी ८ लाख रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून हा निधी संबंधित यंत्रणेस वितरित करण्यात आला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
या मध्ये प्रामुख्याने जिल्हा शल्य चिकित्सक बीड यांचे अधीन जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांसाठी ८ कोटी ४५ लाख रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून हा निधी आता वितरित करण्यात आला आहे.
तर अंबेजोगाई येथील स्वाराती रुग्णालयामध्ये आयसोलेशन वॉर्ड, व्हेंटिलेटर्स, औषध साठा, पीपीई किट, कोरोना चाचणी किट यांसह विविध सामग्री साठी २ कोटी ६३ लाख रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देऊन वितरित करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली उपाययोजना, निधीची मागणी, मंजूर निधी यांसह सर्व गोष्टींवर ना. मुंडे हे बारकाईने लक्ष ठेऊन आहेत तसेच जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी आवश्यक सूचना देत आहेत.
याअंतर्गत उपजिल्हा रुग्णालयात औषधी, यंत्रसामग्री, १० व्हेंटिलेटर्स, एन-९५ मास्क, कोरोना किट, पीपीई किट आदी सामग्री साठी १ कोटी ४८ लाख रुपये निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
तसेच उपजिल्हा रुग्णालयांतर्गत विलगिकरण कक्ष स्थापन करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, १ लाख ट्रिपल लेयर मास्क, ऑक्सिजन सिलेंडर, आडल्ट व्हेंटिलेटर्स यांसह विविध साधन सामग्री साठी ३ कोटी १५ लक्ष रुपये निधी खर्च करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
यातील ५९ लक्ष रुपये हे औषध व तत्सम खरेदीसाठी राखून ठेवण्याचेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
अंबेजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात १० आडल्ट व्हेंटिलेटर्स साठी १ कोटी १४ लाख रुपये राखीव ठेवण्यात आले असून, स्वाराती आवारात आयसोलेशन वॉर्ड व विद्युतीकरण कामासाठी ७१ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
उपजिल्हा रुग्णालयात पाण्यासाठी आरओ, व्हील चेअर्स, व्हॅक्यूम क्लिनर्स, ब्लड कलेक्शन व्हॅन, ट्रान्सपोर्ट व्हॅन, पीपीई किट, सुरक्षा किट यांसारख्या साधनसामग्री साठी ३ कोटी २१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान बीड जिल्हा वार्षिक योजनेतून कोरोना संदर्भात आतापर्यंत निधी व मनुष्यबळ असा दुहेरी सामना युद्धपातळीवर सुरू असून, अद्याप एकही रुग्ण कोरोना सदृश्य जिल्ह्यात आढळलेला नाही. परंतु संभाव्य धोका लक्षात घेता आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे