ताज्या घडामोडी

राजमंड्री, आंध्र प्रदेश येथे अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनचे ९ वे अधिवेशन उत्साहात संपन्न

मुंबई , दि. २१ :- ( विशेष प्रतिनिधी ) – नुकतेच राजमंड्री, आंध्र प्रदेश येथे अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनचे अधिवेशन उत्साहात संपन्न झाले. पहिल्या दिवशी फेडरेशनच्या अध्यक्षा उषा रानी यांच्या हस्ते आयफाचा ध्वज उंचावून अधिवेशनाची सुरवात झाली. त्यानंतर खुल्या सत्रात सिटू सरचिटणीस काॅ तपन सेन यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. सिटू अध्यक्षा काॅ. के. हेमलता यांचे देखील भाषण झाले. अधिवेशनात महाराष्ट्रातील १९ प्रतिनिधी, २ निरीक्षक, १ पदाधिकारी व २ कार्यसमिती सदस्य असे एकूण २४ जण सहभागी झाले.


पहिल्या प्रतिनिधी सत्रात अध्यक्ष मंडळाची निवड झाली त्यात महाराष्ट्रातील पवित्रा ताकसांडे या आयफाच्या कार्यसमितीमधील मदतनीस प्रतिनिधींना संधी दिली गेली. फेडरेशनच्या अध्यक्षा उषा रानी यांचे अध्यक्षीय भाषण झाले व त्यानंतर महासचिव ए आर सिंधु यांनी तीन वर्षांचा राजकीय, संघटनात्मक व कार्याचा अहवाल मांडला. त्यात त्यांनी मोदी सरकारच्या जनविरोधी, कामगार विरोधी व आयसीडीएस विरोधी धोरणांमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कोसळणाऱ्या संकटांबाबत मांडणी केली व आपण त्यांचा मुकाबला करण्यासाठी कोणते स्वतंत्र व संयुक्त लढे केले यावर प्रकाश टाकला. संघटनात्मक दृष्टीने आपण कुठे आहोत याचा लेखाजोखा मांडला. अहवालावर २३ राज्यातील एकूण ६८ प्रतिनिधी बोलल्या. महाराष्ट्राच्या वतीने रजनी पिसाळ, चंदा मेंडे, प्रतिभा भोसले व राधा सुंकरवार यांनी अहवालाला पाठिंबा देत राज्यातील परिस्थिती विशद केली. उपाध्यक्षा शुभा शमीम यांनी ठराव समिती व क्रिडेन्शियल समितीची जबाबदारी पार पाडली. २० तारखेला शेवटच्या सत्रात आयफाच्या पदाधिकारी मंडळाची तसेच कार्यसमितीची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी उषा रानी, महासचिवपदी ए आर सिंधु यांची तर कोषाध्यक्षपदी अंजु मैनी यांची टाळ्यांच्या गजरात फेरनिवड करण्यात आली. शुभा शमीम यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. कार्यसमिती सदस्य म्हणून नागपूरच्या अंगणवाडी सेविका चंदा मेंडे यांची तर मदतनीस प्रतिनिधी म्हणून चंद्रपूर येथील राधा सुंकरवार यांची निवड करण्यात आली. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या राजमंड्री व आंध्र प्रदेश येथील वॉलंटियर्सचे टाळ्यांच्या गजरात आभार मानून व ८ जानेवारी २०२० रोजी होणारा देशव्यापी सार्वत्रिक संप यशस्वी करण्याचा निर्धार घोषणांद्वारे व्यक्त करत अधिवेशनाचा समारोप करण्यात आला.

52 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close