विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे
आयोध्या , दि. ०४ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑगस्टला राम मंदिराच्या पायाभरणीसाठी अयोध्येत ३ तास थांबतील तर १२.३० वाजता भूमिपूजन सुरू होईल, जे बरोबर १० मिनिटे चालेल व त्यानंतर पंतप्रधान भूमिपूजन समारंभात सामील होतील हा कार्यक्रम सव्वा तासाचा असेल तसेच सुरक्षा व्यवस्था पाहता सोमवारी अयोध्यानगरी सील करण्यात आली. भूमिपूजन समारंभ देशात थेट प्रक्षेपणासाठी ४८ पेक्षा जास्त अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात आले असुन हे कॅमेरे दूरदर्शन आणि एएनआयचे आहेत. दोघांच्या हायटेक एचडीओबी व्हॅन उपस्थित आहेत. दूरदर्शन व एएनआयचे १०० पेक्षा जास्त सदस्य परिसरात असतील. ४ ऑगस्टला अयोध्येत दीपोत्सव आणि दुसऱ्या कार्यक्रमासाठी दूरदर्शन व इतर टीव्ही वाहिन्यांच्या चार ओबी व्हॅन राम की पौडीत तीन दिवसांपासून आहेत.
जन्मभूमी परिसरातील मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत विशेष पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील. दरम्यान, तयारीचा आढावा घेण्यासाठी आलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी जेव्हा अयोध्येत जवळपास ५०० वर्षांच्या परीक्षेच्या निकालासोबत भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराची पायाभरणी करतील तेव्हा अयोध्येसोबतच देश आणि जगासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असेल. कोरोनामुळे प्रोटोकॉलचे पालन केले जाईल. ज्यांना आमंत्रण आहे, त्यांनीच येथे यावे. अभिजीत मुहूर्त असल्याने मंदिराच्या कामात कोणतीही अडचण येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
अयोध्या मार्गावर ठेवले जातील रंगीत घडे, आंब्याच्या पानांची सजावट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सांस्कृतिक शाखा संस्कार भारती मातीचे ५१०० घडे सजवत आहे. त्यांना रंग, कपडे, गोटे, आंब्याची पाने आणि दिव्यांनी सजवले जात आहे. हे घडे साकेत महाविद्यालयाकडून जाणाऱ्या अयोध्या मार्गावर ठेवले जातील.
असा आहे श्रेष्ठ मुहूर्त, निर्विघ्नपणे, यशस्वीपणे पूर्ण होईल मंदिर निर्माण
राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त काढणारे गणेश्वरशास्त्रींनी सांगितले, अभिजित मुहूर्ताच्या १६ भागांत १५ अतिशुद्ध असतात. त्यात हे ३२ सेकंद महत्त्वाचे आहेत. बुधवार असल्याने मंदिर निर्मिती निर्विघ्नपणे पार पडेल.
१०४ कोटी रुपये खर्चून अयोध्या रेल्वेस्थानकाला मिळेल राम मंदिराचा आकार
उत्तर रेल्वे अयोध्या रेल्वेस्थानकाला १०४ कोटी रुपये खर्चून भव्य राम मंदिराच्या रूपात तयार करेल. उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव चौधरी यांनी सांगितले, स्थानकाच्या आत आणि बाहेरच्या परिसराचा विकास केला जाईल. तिकीट खिडक्यांची संख्या वाढवली जाईल. प्रतीक्षालय वातानुकूलित असेल आणि विश्रामगृहात पुरुषांसाठी १७ आणि महिलांसाठी १० जादा खाटा असतील. फुटओव्हर ब्रिज, फूड प्लाझा, दुकाने, पर्यटन केंद्र, टॅक्सी स्टँड, व्हीआयपी लाउंज अशा सुविधा उपलब्ध केल्या जातील.