कोरोना बाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारा जळतनाचा प्रश्न बनला जटिल..
यवतमाळ – जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असुन यामुळे मृतांचा आकडा वाढत असल्याने या रुग्णांच्या मृत्युनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनाकडे निधी उपलब्ध नाही त्याकारणाने लाकडे मिळत नसल्याने लाकडे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्वाभिमान कामगार संघटनेचे निरज वाघमारे यांनी विभागीय आयुक्त पियुष सिंह केली आहे.
कोरोना संसर्गजन्य आजाराने जिल्ह्यात पुन्हा डोक वर काढल्याने दिवसाकाठी शेकडो कोरोना रुग्णांची भर पडत असून १० ते १५ रुग्णांचा जीव जात आहे. हा संसर्ग वाढू नये या करिता शासन युद्धपातळीवर काम करत असून सर्वच प्रतिबंधात्मक उपयोजना ही करत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनात मृत्यूमुखी पडलेल्या कोरोना बाधितांच्या मृत्यूदेहाला त्यांच्या नातेवाईकाच्या हाती न देता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे काम प्रशासन करत आहे.परंतु या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांची गरज असते परंतु यासाठी शासनाकडून कोणताही निधी उपलब्ध केल्या गेला नसल्याने अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकडे खरेदी करणे शक्य होत नसल्याकारणाने जिल्हाप्रशासन, आरोग्य विभाग, नगर परिषद प्रशासन यांची चांगलीच दमछाक होत आहे तर प्रशासनातील काही अधिकारी सर्व बाबींना छेद देत जिल्ह्यातील सामाजिक संस्था ,दानशुर दाते यांच्याकडे लाकडे गोवऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी मदत मागत आहेत.कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी करोडो रुपयांचा खर्च शासन करीत आहे तर दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहावरअंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडे,गोवऱ्या उपलब्ध करून द्या म्हणुन इतरांसमोर हात पसरावे लागत असल्याने ही बाब प्रशासनाला अशोभनीय अशी आहे त्यामुळे आपण याकडे लक्ष घालुन कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारे लाकूड,गोवऱ्या खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी स्वाभिमान कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निरज वाघमारे यांनी अमरावती विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या मागणीची दखल घेत विभागीय आयुक्तांनी तात्काळ हा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली. याच बरोबर जिल्ह्यातील इतर समस्यांना घेऊन लवकरच जिल्हा दौरा करणार असल्याची माहिती यावेळी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिली…