Home विदर्भ गवळाऊ गाईमुळे दुग्ध व्यवसायला समृद्धी येईल – सरिता गाखरे

गवळाऊ गाईमुळे दुग्ध व्यवसायला समृद्धी येईल – सरिता गाखरे

227

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

• गवळाऊ जनावरांचे प्रदर्शन व दुग्ध स्पर्धा

• 10 लिटर दुध देणाऱ्या गाईला मिळाला प्रथम पूरस्कार

• चॅम्पियन ऑफ दि शो अमरावती मधील गोकुलं गोरक्षण संस्थेला.

वर्धा , दि. १८ :- परदेशी गाईंप्रमाणे गवळाऊ ही देशी गाय सुद्धा 10 लिटर दुध देते. या गाईची रोग प्रतिकार शक्ती आणि तिचा संगोपन खर्च कमी असल्यामुळे गोपालकांनी वर्धा जिल्ह्याची ओळख असलेल्या गवळाऊ गाईचे पालन व संगोपन केल्यास जिल्ह्यात दुग्ध व्यवसायात समृद्धी येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता साखरे यांनी केले.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) पशुसंवर्धनासाठी प्रदर्शन व प्रचार कार्यक्रमांतर्गत मोरांगणा येथिल हुतात्मा स्मारक येथे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व आर्वी पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गवळाऊ जनावरांचे प्रदर्शन व दुग्धस्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना श्रीमती गाखरे बोलत होत्या. आमदार दादाराव केचे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मुकेश भिसे , समाज कल्याण समिती सभापती नीता गजाम, जिल्हा परिषद सदस्य विनोद लाखे, नितीन अरबट, राजश्री राठी, बाबासाहेब अवथळे, सरपंच नीलिमा अक्कलवार, एन डी डी बी आनंद चे पशु प्रजननचे महाव्यवस्थापक राजेश गुप्ता, प्रादेशिक पशु संवर्धन सहआयुक्त डॉ. किशोर कुंभरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ राजीव भोजने, भंडारा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नितीन फ़ुके, अलोने, अंदूरकर, गट विकास अधिकारी व्ही व्ही जमदाडे उपस्थित होते.गवळाऊ गाय ही फक्त कारंजा, आर्वी या पट्ट्यात आढळून येते. पूर्वी ही भरपूर दूध देणारी गाय म्हणून ओळखली जात होती. मात्र तिच्या शारीरिक क्षमतांमुळे कालांतराने तिचा उपयोग शेतीच्या कामासाठी व्हायला लागला आणि तिच्या औषधीयुक्त दुधाकडे दुर्लक्ष झाले. यावर्षी झालेल्या दुग्ध स्पर्धेमध्ये 10 लिटर दुध देणारी गाय आढळून आली आहे. त्यामुळे गवळाऊ गाईला पुन्हा भरपूर दूध देणारी गाय अशी ओळख निर्माण करून देण्याची जबाबदारी या निमित्ताने गोपालकांनी घ्यावी, असे आवाहन गाखरे यांनी केले. या गाईचे शेण सुद्धा शेतीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे शेतकऱयांनी त्यांच्या शेतीसाठी, कुटुंबासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी किमान एक गाय सांभाळावी असा आग्रह त्यांनी यावेळी केला.
यावेळी गवळाऊ गाईचे जतन करण्यासाठी या गाईच्या गुणवैशिष्ट्यांचा प्रसार प्रचार करण्यासाठी दुग्ध स्पर्धा आयोजित करून गोपालकांमध्ये स्पर्धेचे वातावरण तयार केले आहे. गोपालकांनी जिद्दीने या स्पर्धेत सहभागी होऊन बक्षीस मिळवले हे कौतुकास्पद आहे. या गाईच्या प्रचार प्रसारसाठी गोपालकांनी असाच सहभाग कायम ठेवावा असे आवाहन आमदार दादाराव केचे यांनी केले.
शेतकऱयांनी किमान शेणखतासाठी गवळाऊ गाई पाळाव्यात. देशी गाईच्या दूधाला इतर गाईंच्या दुधापेक्षा दुप्पट भाव आहे.तिच्या शेणापासून तयार होणाऱ्या गोवऱ्याची सुद्धा पूजेसाठी जास्त दराने मागणी असते. त्यामुळे या गाईचा जास्तीत जास्त वापर करा.
जिल्हा परिषदतर्फे लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गाईच्या गटामध्ये यावर्षी पासून गवळाऊ गाई देण्यात याव्यात असा प्रस्ताव मांडणार असल्याचे मुकेश भिसे यांनी सांगितले.

यावेळी घेण्यात आलेल्या पशु प्रदर्शनीत चॅम्पियन ऑफ द शो बक्षीस गोरक्षण गोकुल नांदोरा येथील अभिषेक हरिकीसन मुरके यांच्या वळूला मिळाला. गवळाऊ वळू पुरस्कार प्रथम 12 हजार रुपये तळेगाव रघुजी येथील अभय कालोकार, द्वितीय 9 हजार रुपये देवळी तालुक्यातील रोहणी चे मोहन नंदनवार तर तृतीय बक्षीस 8 हजार रू गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील शिवणीचे अशोक गायधने यांच्या वळूला देण्यात आला. गावळाऊ गाय गटात 12 हजार रुपयांचे प्रथम बक्षिस खरांगणा येथील भोजराज अरबट, द्वितीय 10 हजार रुपये वर्धा तालुक्यातील वायगाव निपाणीचे ओम प्रकाश कुंभलकर, तृतीय 8 हजार रुपये खरांगणा येथील लोभेश्वर सपकाळे यांच्या गाईला देण्यात आलं.
गावळाऊ कालवड गटात 11 हजार रुपयांचे प्रथम बक्षीस खरांगणा येथील रुपेश अरबट, द्वितीय 10 हजार रू अहिरवाडा येथील महेंद्र सोटे, तृतीय 8 हजार रू काचनूर चे शंकर राऊत यांच्या कालवडीला देण्यात आले.तसेच दुग्ध स्पर्धेत 10 लिटर दुध देणारी गाय प्रथम आली. गोपालक देविदास राऊत काचनूर यांना 9 हजार रुपये प्रथम बक्षिस, द्वितीय कारंजा तालुक्यातील भिवापुरचे प्रवीण गळहाट यांना तर खरांगणा येथील संजय अक्कलवार यांना 5 हजार रुपयांचे तृतीय बक्षीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रज्ञा डायगव्हाणे- गु ल्हाने यांनी तर संचालन डॉ वंजारी यांनी आणि खरांगणाच्या सरपंच यांनी आभार मानले.