अयनुद्दीन सोलंकी,
घाटंजी / यवतमाळ – घाटंजी तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्यात सद्यास्थितीत कोरोना covid – 19 ची संबधित कामे पंचायत विस्तार अधिकाऱ्यांना करावी लागत असल्याने महाराष्ट्र राज्यातील गट विकास अधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी व पंचायत विस्तार अधिकारी यांना पन्नास लाखाचे विमा कवच मंजूर करण्यात यावे, अशी मागणी घाटंजी पंचायत समितीचे प्रभारी सहाय्यक गट विकास अधिकारी पंजाब रणमले यांनी शासनाकडे केली आहे.
घाटंजी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उप केंद्र, कोविड केअर केंद्र, घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालय, प्रतिबंधित क्षेत्र, कोरोना रुग्ण तपासणी केंद्र आदी ठिकाणी जिल्हाधिकारी अमोल येडगे, तहसीलदार पुजा माटोडे व पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर आदींच्या आदेशान्वये कोरोना संबंधित कामे पंचायत विस्तार अधिकाऱ्यांना करावी लागत आहे. विशेष म्हणजे केंद्रावर भेटी देत असतांना सबंधित अधिकारी पाँजीटिव्ह येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पंचायत विस्तार अधिकाऱ्यांसाठी बेड आरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक व जरूरीचे आहे.
तथापि, पन्नास लाखांच्या विमा कवच मध्ये गट विकास अधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी व पंचायत विस्तार अधिकारी यांचा समावेश नाही. मात्र, यापूर्वी जे पन्नास लाखाचे विमा कवच शासनाकडुन देण्यात येते, त्याच शासन परिपत्रकात गट विकास अधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी व पंचायत विस्तार अधिकारी आदींना सुद्धा पन्नास लाखाचे विमा कवच मंजूर करून वरील परिपत्रकात समाविष्ट करण्याची मागणी, पंचायत विस्तार अधिकारी पंजाब रणमले यांनी शासनाकडे केली आहे.