Home उत्तर महाराष्ट्र संप्रदायाचे पांघरून अंगावर घेणाऱ्यांना कोण शिक्षा करणार ?

संप्रदायाचे पांघरून अंगावर घेणाऱ्यांना कोण शिक्षा करणार ?

420

नाशिक – मागच्या काही दिवसांपूर्वी ह.भ.प. गजाननबुवा चिकनकर कल्याण ( द्वारली) नामक एका वारकरी बुवाने आपल्या पत्नीला अमानवी अशी पशुवत मारहाण केली, घरातीलच एका नऊ वर्ष वयाच्या मुलाने हा सारा प्रकार उभ्या महाराष्ट्राला दाखविला कदाचित या लहानग्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला नसता तर महान अशा वारकरी संप्रदायाचा मळवट भरून त्याच्या आड लपून आपला माज साजरा करणारे ढोंगी इथल्या समाज्याला दिसले नसते.केवळ एका मुलाने ही विकृती बाहेर काढली. या अनुषंगाने संबध महाराष्ट्रभर या घटनेचे पडसाद उमटले.सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा व वारकरी पंथाशी निगडित अनेकांच्या संतापाचा कडेलोट होत होता.अर्थात घटना तितकीच निंदाजनक आणि अमानवी असल्याने त्यातली त्यात वारकरी संप्रदायामध्ये काम करण्याऱ्या बुवाची असल्याने ती अधिक संवेदनशील बनली.अनेकांनी या बुवांचा खरपुस समाचार घेतला. काहींनी तो वारकरी असूच शकत नाही कारण खरा वारकरी असे करणार नाही.एका नतद्रष्ट बुवामुळे संप्रदाय का बदनाम करावा ? बाकी लोक तर पंथाची इमाने इतबारे सेवा करत आहेत. मग एक चिकणकर वाईट निघाला म्हणजे समस्त संप्रदाय चुकीचा ठरत नाही, अशा खूप प्रतिक्रिया समाजमाध्यमातून उमटत राहील्या. बातमी गजानन बुवांच्या द्वारली गावापर्यंत थांबली नाही ती पोलिसात जायला वेळ लागला नाही.अध्यात्माचा बुरखा चढवकेला बुवा पोलिसांनी गजाआड केला.आणि महिलेच्या मारहानीच्या घटनेवर पडदा पडला.मात्र या सरकारी मलमपट्टीने या घटनेवर पडदा जरी पडला असला तरी वास्तवात तो उघडला आहे, असेच म्हणावे लागेल. खरंतर या घटनेने सर्व महाराष्ट्रभर असणाऱ्या आणि कोणत्याही मोठ्या संप्रदायाच्या भक्कम तटबंदीच्या आड लपून आपल्या विकृतीचे भरणपोषण करणारे काही कमी नाहीत. चिकणकरच्या निमित्ताने ते पुढे आले एव्हढेच. आता चिकणकरच्या आळंदी, पंढरपूर वाऱ्या, त्याचा चातुर्मास वगेरे या गोष्टी ज्यांनी जवळून पहिल्या आहेत, विशेष म्हणजे त्याच्या संपर्कात येणारा सारा वारकरी वर्ग हा प्रकार पाहून सतापून गेला आहे. त्यांनी त्यावर मात्र काही भाष्य केले नाही.समस्त वारकरी संप्रदायाची नेतृत्व करणारी मंडळी यात पुढे आली नाही. कोरोनाची भयावह अशी महामारी सूरु असताना मंदिरे उघडी करा असा कंठशोष करणारे संप्रदायातील लोक मूग गिळून गप्प आहेत.कुणी साधा निषेधाचा सूर काढला नाही तर त्या बुवाला जाब विचारणे दूरच राहिले.

*भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी* ह्या तुकोबारायांच्या अभंगाला आपण सार्थ कधी करणार ? आपल्या पत्नीला मारहाण करणाऱ्या केवळ साधीसुधी मारहाण नाही तर जीवघेणी मारहाण करणारा बुवा आमच्या गोटातील नाहीच,कारण तो वारकरी असता तर तो असे वर्तन करूच शकला नसता. ही संप्रदायात काम करणाऱ्या समस्त लोकांनी काढलेली शुद्ध पळवाट आहे.मग ज्या एका राजकिय पक्षाच्या महिला आघाडीतील सदस्यांनी तेथील कुटुंबातील महिलांना जाब विचारला त्यांना काय म्हणणार ? त्यांनी हे काम सामाजिक बांधिलकीपोटी केले.समज दिली त्या बुवाच्या घरात ज्या महिला आहे त्यांच्यासमक्ष हा प्रकार घडला त्यांना तंबी दिली. आता राजकीय पक्षाचा आणि संप्रदायाचा तसा दुरूनही संबंध नाही. चिकणकर बुवाचे वय पाहता साठीपार आहे बुवा.तेव्हा किमान पाच, पन्नास वर्षे तरी वारकरी संप्रदायाचे नाव घेऊन हा बुवा जगला त्याचे काय ? त्याचा आणि संप्रदायाचा संबंध नसता तो त्यात महाराज म्हणून काम करत नसता तर त्याची अशी नामुष्की ओढून घेण्याची वेळ आली नसती.बाकीचे लोकही घरातील बायकांचा छळ करतात, दारू पिऊन धिंगाणा घालतात. त्याची चर्चा होत नाही.या बुवाची झाली कारण तो एका महान अशा संप्रदायाचा घटक आहे, अनुयायी आहे, त्याला परंपरा आहे, म्हणून त्या बुवाला नैतिक जाब विचारण्याचा अधिकार संप्रदायातील मान्यवर धुरीनाना आहे.मात्र तसे होताना दिसले नाही,एवढ्यावरच न थांबता सोयीस्करपणे त्यातून बाजूला कसे होता येईल,अशा प्रतिक्रिया समाज माध्यमावर उमटू लागल्या. आता या ठिकाणी प्रश्न आहे मानसिक विकृतीचा जी विकृती काही एका चिकणकर मध्ये आहे आणि दुसऱ्यात घडणार नाही असे नाही.अपवादाने दुसरा कुणी असे करणारच नाही हे आपल्याला सांगता येणार नाही. मानवी प्रवृत्ती हा तर मानसशास्त्राचा आणि आध्यात्माचा विषय आहे. त्यादृष्टीने जरी चिकणकरकडे पाहिले तरी तो कोण्या संप्रदायाचा विषय होत नाही हेही तितकेच खरे आहे.पण अधिक चिकित्सक दृष्टीने याकडे पाहिले तर चिकणकर एक मार्गदर्शकाचाही भूमिकेत आहे.जेव्हा एक शिक्षक मुलांना आदर्श वागणुकीचे धडे देतो, आणि तोच शिक्षक जर अपराधी होत असेल तर त्याला समज देण्याचे काम त्या शिक्षण व्यवस्थेचे असते.त्याला अंगठे धरायला लावायचे की उठाबशा काढायला लावायच्या हा ज्या त्या व्यवस्थेचा विषय असतो कारण त्या ठरावीक संस्थेचे नाव घेऊन तो समाजात वावरत असतो. मग संस्था म्हणत नाही की तो आमचा नाही, संस्था त्याला पोलिसात देते, कारवाई करायला भाग पाडते.आणि जाहीररीत्या त्याचा निषेध नोंदवते.ही कोणतीच प्रक्रिया वारकरी स्तरातून उमटली नाही, म्हणून दुःख आहे, प्रश्न एका चिकणकरचा नाही पण आज एक चिकणकर सोडला त्याला संप्रदाय काहीच बोलला नाही, तर उद्या हजारो चिकणकर तयार होतील जे खुलेआम वारकरी संप्रदायाचे नाव घेऊन जगतील, वाऱ्या करतील, घरातील वयोवृध्द बायकांना मारतील आणि कीर्तनातून उपदेश करत बसतील , हे घडू नये म्हणून संप्रदायाचे पांघरून घेऊन वाटमाऱ्या करणारे वेळीच ठेचून काढले पाहिजे तरच ही बुरखाधारी मंडळी जगाच्या समोर येईल.

अमर ठोंबरे
अध्यक्ष वारकरी सेवा समिती नाशिक