प्रतिनिधी
परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्व बँकेतील शेतकऱ्यांच्या बचत खात्यावरील होल्ड हटवण्याची मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी अग्रणी बँकेचे अध्यक्ष श्री हट्टेकर यांच्याकडे केली .
यासंदर्भात प्रतिनिधीक स्वरूपात गंगाखेड येथील मुख्य रस्त्यावरील एसबीआय बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन देण्यात आले. कर्ज वसुलीच्या नावाखाली बँकाकडून शेतकऱ्यांचे खाते गोठविण्यात येत आहेत. त्या गोठवलेल्या खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे पैसे पडत असतील तर ते खाते गोठवू नयेत अथवा गोठवली असतील तर काढून टाकावेत असा शासकीय नियम आहे. या संदर्भात परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या स्वाक्षरीने लोकसभा मतदार संघातील सर्व बँकेच्या शाखा व्यवस्थापक यांना लेखी आदेश पाठवण्यात आल्याची माहिती अग्रणी बँकेचे प्रमुख हट्टेकर यांनी सखाराम बोबडे पडेगावकर यांना दिली. यावरूनही संपूर्ण परभणी लोकसभा मतदारसंघात ज्या शेतकऱ्यांचे गोठवलेले खाते बँकेचे कर्मचारी काढत नसतील तर त्यांनी संबंधित तहसीलदार ,उपजिल्हाधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले. निवेदनावर धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, माजी उपसरपंच शिवाजी महाराज बोबडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.