घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची देणी इंद्रेश्वर शुगर्स उपळाई,लातूर जिल्ह्यातील श्री साईबाबा शुगर्स व सचिन घायाळ शुगर्स पैठण या कारखान्यांनी थकवली असल्या बाबतचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साखर आयुक्त,पुणे यांना देण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी थकीत उसबीला विषयी साखर आयुक्त यांना ईमेलद्वारे तर औरंगाबाद प्रादेशिक सह संचालक यांना प्रत्यक्ष निवेदन ९ ऑगस्ट रोजी देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,कारखान्याला घातलेल्या उसाचे देणी १४ दिवसांच्या आत देणे बंधनकारक असताना जालना जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची देणी बार्शी तालुक्यातील इंद्रेश्वर शुगर्स,औसा तालुक्यातील श्री साईबाबा शुगर्स शिवणी (बु) व पैठण तालुक्यातील सचिन घायाळ शुगर्स ( संत एकनाथ )या कारखान्यांनी थकवली असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
अंबड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा ऊस सोलापूर जिल्ह्यातील इंद्रेश्वर शुगर्स,लातूर जिल्ह्यातील श्री साईबाबा शुगर्स शिवणी (बु) व औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील सचिन घायाळ शुगर या तीन साखर कारखान्यांनी गेल्या ५ महिन्यांपासून शेतकऱ्यांची कोटींची देणी थकविली आहेत.विशेष बाब म्हणजे श्री साईबाबा शुगर्स या कारखान्याने शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात दिलेले धनादेश खात्यावर रक्कम नसल्याने वटले नाहीत.या सर्वच कारखान्यांचे जानेवारी ते एप्रिल २०२१ पर्यंतची ही देणी थकीत आहेत.उसाचे बिल वेळेवर मिळत नसल्याचे शेतकरी संताप व्यक्त करत आहे.हे साखर कारखानदार थकीत देणी कधी देणार? याबाबत ऊस उत्पादकांमधून संताप व्यक्त करत आहेत.
मागील ऊस हंगाम संपला असून,आता पुढचा हंगाम येण्याची वेळ आली आहे.ऊस कारखान्यांना घातल्यानंतर कायद्याने केवळ १४ दिवसांत साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादकांना त्याची देणी देणे बंधनकारक आहे.मात्र,या साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना सात ते आठ महिन्यांपासून देणी न दिल्याने ऊस उत्पादकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या मार्फत इंद्रेश्वर शुगर्सला गेलेल्या ऊसाचे एक हजार प्रति टनाने बिल मिळाले.मात्र उर्वरित रक्कम कधी मिळे याची शाश्वती कुणीच देत नाही.
यंदा जालना जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाची समस्या निर्माण झाली होती.त्यामुळे जिल्ह्याबाहेरच्या साखर कारखान्यांना शेतकऱ्यांनी ऊस दिला.मात्र या शेतकऱ्यांना बिले मिळाली नसल्याने हे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.या सर्व अडचणी असतानासुद्धा साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादकांची पिळवणूक होत आहे.ऊस उत्पादकाच्या या अडचणींकडे साखर आयुक्त आणि साखर सहसंचालक यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आहे.
अद्यापही या साखर कारखान्याच्या विरोधात साखर आयुक्तांनी जप्तीची कार्यवाही केली नसल्याने ही आश्चर्याची बाब आहे.या कारखान्याकडील थकीत देणी व्याजासह या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने औरंगाबाद विभागाच्या प्रादेशिक सह संचालक कार्यालयात दि १५ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येईल,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
अंबड तालुक्यातील लहुराव ढेपे,सुभाष रोटे,परमेश्वर चौरे,नारायण आमटे,किसन पवार,विलास कटारे,अमीर पठाण,भगवान रोटे,रामा वायसे,अर्जुन घाडगे,गंगाधर कणके,संतोष कटारे,शोभाबाई औटे, कांता बोचरे,रुख्मिनबाई बोचरे,बाबुराव शेंद्रे,विलास उंडे,सखाराम तांबे,राजेंद्र चांदीवाल,अशोक उंडे,तान्हाजी उंडे,निसरखाँ पठाण, अजिजखाँ पठाण,अंबादास नाझरकर,नारायण आमटे,एकनाथ मडके यांच्या सह हजारो शेतकऱ्यांची बिले या कारखान्याकडे थकली आहेत.