सुशांत आगे – पुणे
बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र ओमप्रकाश शेटे यांची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री मा सौ भारतीताई पवार यांचे सहाय्यक खाजगी सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. दिंद्रुड ते दिल्ली ‘व्हाया रुग्णसेवा’ असा प्रवास करणाऱ्या ओमप्रकाश शेटे यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओमप्रकाश शेटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीची कवाडे गोरगरिबांशी उघडी केली होती. तसेच हजारो गोरगरीब रुग्णांना जीवनदान मिळवून देण्याचे पवित्र कार्य त्यांनी केले आहे. ओमप्रकाशजी त्यांना मिळालेल्या नव्या जबाबदारीला पूर्ण न्याय देतील आणि राज्यातील तसेच देशातील गोरगरीब रुग्णांची न भूतो न भविष्यतो अशी सेवा करतील असा विश्वास अनेक मान्यवरांनी व्यक्त केला आहे.
थेट दिल्लीत केंद्र स्तरावर आरोग्य क्षेत्रात इतक्या महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. भारतीताई पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे ओमप्रकाश शेटे यांनी आभार मानले आहेत. तसेच देशातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्याचे काम आपण इमाने इतबारे करु असे अभिवचन शेटे यांनी दिले. शेटे यांच्या निवडीने बीड जिल्ह्याच्या वैभवात मनाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांचे बंधू डॉ. शिवरत्न शेटे हे सुद्धा केंद्रीय आयुष मंत्रालयावर संचालक असून या दोन्ही भावांकडून महाराष्ट्रातील गोरगरीब रुग्णांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.