मतदार राजा जागा हो…
२५ जानेवारी १९५० हा निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आणि हाच दिवस प्रतिवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. मतदान प्रक्रियेप्रती आजचा युवक जागरुक व प्रेरित व्हावा या मूळ हेतूने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. आजच्या युवकांना त्यांचा मतदानाचा योग्य तो अधिकार मिळावा ते जागरुक व्हावेत तसेच त्यांनी राष्ट्राच्या विकासाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडावी यासाठी युवक हाच केंद्रबिंदू मानून वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींना संविधानाच्या अनुच्छेद ३२६ नुसार मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. मतदान करणेसुद्धा देशसेवेचाच एक भाग आहे. लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यास, विकासाला गती येण्यास भरीव मदत होते. याच दृष्टिकोनातून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे आहे. किंबहुना मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
‘‘मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो! मतदानानिमित्त सुट्टी आहे, या सुट्टीचा आनंद उपभोगू, कुठेतरी सहल काढू!’’ हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस होय. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे एकाएका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो ही बाब गांभीर्याने लक्षात घ्यायला हवी.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी प्रत्येक हिंदुस्थानीयाच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती ओसंडून वाहते. याच पद्धतीने ध्वजदिन निधी संकलनासही जनता सढळ हस्ते मदत करते. नैसर्गिक आपत्ती असो किंवा युद्धजन्य परिस्थिती, प्रत्येक हिंदुस्थानी नागरिक देशप्रेमाने भारावून जाऊन मदतीसाठी पुढे सरसावतो व आपल्या परिस्थितीनुसार मदत करतो. तद्वतच मतदानाबाबतही लोकांच्या मनात अशी कर्तव्यभावना चेतविण्याची नितांत गरज आहे. लोकशाही बळकटीकरण करण्याचा मुख्य हेतू म्हणजे सत्ता ही लोककेंद्रित करून समाजातील सर्व घटकांना समान संधी, समान न्याय मिळावा. या सर्व प्रक्रियेत आजच्या नवमतदारांची भूमिका ही अतिशय निर्णायक ठरू शकते हे आजच्या युवा पिढीने लक्षात घ्यावयास हवे. मागील काही वर्षांतील निवडणुकांतील मतदानाच्या टक्केवारीचा अभ्यास केला तर एक बाब आपल्या सहज लक्षात येईल आणि ती म्हणजे मतदानाचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चालले असून युवा पिढीचा मतदानाप्रती निरुत्साह वाढत आहे ही खरोखरच अतिशय चिंतेची बाब आहे. आज खऱ्या अर्थाने ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. स्थानिक प्रशासन तसेच सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन यासाठी लढा उभारण्याची आज गरज आहे.
लोकशाहीने दिलेल्या हक्कांपैकी मतदानाचा हक्क हा सर्वात मोठा हक्क आहे. आपल्या मतदानाच्या या हक्कामुळे परिवर्तन होऊन देशाचे भवितव्य ठरू शकते. त्यामुळे युवकांनी निराशावादी भूमिका न घेता जागरुकतेने व स्वयंस्फूर्तीने प्रत्येक निवडणुकीध्ये आपला मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कार्यामध्ये आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. लोकशाहीचे बळकटीकरण करायचे असेल तर जागरुक युवा मतदारांचा एक मोठा वर्ग अस्तित्वात येणे गरजेचे आहे ज्यामुळे आपला देश विकसनशीलतेकडून विकसित देश होण्यास निश्चितच मदत होईल. मतदानातून लोकशाही सक्षम होत असते. सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी लोकशाही मजबूत असणे आवश्यक आहे. त्यामुळे देश घडवायचा असेल तर चांगले लोकप्रतिनिधी निवडून यायला हवेत. ती जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यासाठी मतदान करणे हाच एकमेव लोकशाही मार्ग ठरतो.
फिरोज खान, पुसद
मो.नं.९८५०५९५५५७
(एम.ए. समाजशास्त्र)