घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बन बँकेमध्ये दिवसाढवळ्या सिनेस्टाईल दरोडा पडला. हातात पिस्टल असलेल्या दरोडेखोरांनी सर्व कर्मचाऱ्यांना कोंडून २५ लाख रुपये रोख रक्कम व तारण असलेले अंदाजे ७५ लाख रुपयांचे सोन्याचा मुद्देमाल घेऊन लंपास झाले.या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत शहागड येथील बाजार पेठेतील वर्दळीच्या ठिकाणी बुलढाणा अर्बन बँकेची शाखा आहे. कामकाजाची वेळ संपल्यानंतर खातेदारांची वर्दळ कमी झाल्याचा फायदा या दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला. कर्मचारी दैनंदिन कामकाज संपवून क्लाझिंग चे काम सुरू असतांना हातात पिस्टल असलेले तीन दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला.पिस्टल चा धाक दाखवून सर्व कर्मचाऱ्यांना एका खोलीत कोंडून घेतले.
यानंतर दरोडेखोरांनी कॅश काउंटर व स्ट्रॉंग रूम कडे मोर्चा वळवला. स्ट्रॉन रूम मधील लॉकर मधील सोन्याचे दागिने व २५ लाख रुपये रोख रक्कम घेऊन दरोडेखोर पसार झाले.या दरोड्यात नेमका किती मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटला याची नोंदीनुसार ची मोजदाद सध्या सुरू आहे. अंदाजे ७५ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लुटून नेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलीस उप निरीक्षक गजानन कोळासे यांच्या सह पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करत आहेत.