Home विदर्भ कुर्ली येथील विनयभंग व खंडणी प्रकरणात पारवा पोलीसांनी अखेर घाटंजी न्यायालयात ब...

कुर्ली येथील विनयभंग व खंडणी प्रकरणात पारवा पोलीसांनी अखेर घाटंजी न्यायालयात ब वर्ग समरी दाखल केला..!

482

 पिडीत शिक्षिका घाटंजी न्यायालयात आक्षेप दाखल करणार..?

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुर्ली येथील पिडीत सहाय्यक शिक्षिकेच्या तक्रारीवरुन पारवा पोलीसांनी कुर्लीचे सरपंच सतीष लचमारेड्डी गड्डमवार, माजी सरपंच विलास राजन्ना बडगुलवार, सहाय्यक शिक्षक दिपक महाकुलकर, सहाय्यक शिक्षक किसन किणाके व शिक्षक नितीन मुद्देलवार यांचे विरुद्ध 12 जुलै रोजी अपराध क्रंमाक ०३५६ भादंवि कलम ३८४ (खंडणी मांडणे), ३५४ (अ) (शरीर सुखाची मागणी करणे), १४३, १४९, ५०४ व ५०६ अन्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले होते. सदरचे प्रकरण गंभीर असल्याने पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोरख चौधर ह्यांनी स्वतः तपास सुरू केला होता.
मात्र, सदर घटना घडलीच नसल्याचा निष्कर्ष पारवा पोलीसांनी काढला असून सदर गंभीर प्रकरणात घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एफ. टी. शेख यांच्या न्यायालयात ब वर्ग समरी फायनल दाखल केला आहे.
दरम्यान, फिर्यादी पिडीत सहाय्यक शिक्षिकेने आपण दिलेल्या बयाणानुसार पारवा पोलीसांनी आपले बयाण नोंदविलेले नाही. त्यामुळे पिडीत महीलेने कुर्ली येथील विनयभंग व खंडणी प्रकरणातील संशयित आरोपीविरुद्ध 17 जुलै रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना रजिष्टर पोष्टाने व नंतर 19 जुलै रोजी प्रत्यक्ष भेटून विनयभंग व खंडणी प्रकरणातील संपूर्ण आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती.
सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांच्या आदेशावरून अपर पोलीस अधीक्षक डाँ. खंडेराव धरणे यांनी पिडीत शिक्षीका महीलाचे बयाण पोलीस अधीक्षक कार्यालयात नोंदविलेले असून पारवा पोलीसांनी आपण सांगीतल्या प्रमाणे बयाण नोदंविले नसल्याचा आरोप करुन संबधित तपास अधिकारी हे आरोपींना मदत करत आहे तसेच आरोपींना वाचवित असल्याचे बयाण नोंदविले. त्या नंतर 11 आँगस्ट रोजी सी.आर.पी.सी. कलम 164 अंतर्गत घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एफ. टी. शेख यांच्या समक्ष न्यायालयात बयाण नोंदविले आहे.
न्यायालयातील बयाण सुद्धा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या लेखी तक्रारी नुसार नोंदविल्याचे विश्वासनिय वृत्त आहे. मात्र, पारवा पोलीसांनी सदरचा गुन्हा अजामीनपात्र असतांना सुद्धा संबधित संशयित आरोपींना अटक केलेली नाही, हे येथे उल्लेखनीय.
पारवा पोलीस स्टेशन मध्ये दाखल तक्रारीनुसार, पिडीत सहाय्यक शिक्षिका ही १२ जुलै रोजी दुपारी कुर्ली येथील केन्द्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळेत, शाळेत विद्यार्थी नसल्याने मुख्याध्यापक कार्यालयात एकटी बसून होती. त्याच वेळी कुर्लीचे सरपंच सतीष गड्डमवार, माजी सरपंच विलास बडगुलवार, सहाय्यक शिक्षक दिपक महाकुलकर, सहाय्यक शिक्षक किसन किणाके व शिक्षक नितीन मुद्देलवार हे पांचही जन कार्यालयात येऊन सहाय्यक पिडीत शिक्षिकेला शरीर सुखाची मागणी केली. तसेच तुम्ही शाळेचे पैसे खाल्याने तुमच्या विरोधात आम्ही पंचायत समितीला तक्रार केली आहे. सदर प्रकरण बंद करायचे असेल तर आम्हाला दिड लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी पिडीत सहाय्यक शिक्षिकेला सरपंच व माजी सरपंच यांनी दिल्याचे अपर पोलीस अधीक्षक व घाटंजी न्यायालयात दिलेल्या बयाणात सांगीतले असून, संबधित पिडीत महीलेला सहाय्यक शिक्षक दिपक महाकुलकर व किसन किणाके यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचे बयाण सुद्धा नोंदविल्याचे समजते. या बाबतची तक्रार पिडीत सहाय्यक शिक्षिकेने १२ जुलै रोजी पारवा पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यावरुन पारवा पोलीसांनी पांचही आरोपी विरूध्द भादंवि कलम – ३८४, ३५४ (अ), १४३, १४९, ५०४ व ५०६ अन्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते.
🔵➡️ कुर्ली येथील सहाय्यक शिक्षिका कु. माधुरी ईथापे हिची प्रतिक्रिया घेतली असता, पारवा पोलीसांनी अगोदर पासुनच आरोपीच्या बाजुने तपास केलेला असून माझी तक्रार खोटी ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. पारवा पोलीसांनी घाटंजी न्यायालयात ब समरी फायनल दाखल केला असला तरी त्यात सीसीटीव्ही फुटेज सारखे पुरावे अजिबात नाही. तसेच मला अद्यापही घाटंजी न्यायालयाकडून कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही. तसेच सदर प्रकरणात बनावट व खोटे साक्षदारांचे बयाण नोंदवून माझी तक्रार खोटी ठरविण्याचा प्रयत्न तत्कालीन ठाणेदार यांनी केला आहे. मला घाटंजी न्यायालयाची नोटीस प्राप्त होताच आपण ब समरी फायनल प्रकरणात समरी फेटाळण्यासाठी न्यायालयात आक्षेप दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.