Home नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या नवीन 25 ते 30 शाखा उघडणार – खा.प्रतापराव पाटील...

जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या नवीन 25 ते 30 शाखा उघडणार – खा.प्रतापराव पाटील चिखलीकर

547

महेन्द्र ‌गायकवाड‌ 

नांदेड – शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा बँकेतील वाढलेला आर्थिक देवाण-घेवाणीचा कारभार आणि ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांचा असलेला तुटवडा लक्षात घेता खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय अर्थ मंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांच्या नवीन 25 ते 30 शाखा उघडणार आहेत.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सह.बँक तोटयात आल्याच्यानंतर 129 शाखा बंद करण्यात आल्या किंवा कराव्या लागल्या. त्यामुळे शेतकरी व कष्टकरी यांना बँक व्यवहाराची अडचण भासत होती. पदमश्री शामरावजी कदम यांनी ग्रामीण भागातील शेतक-यांच्या सुविधासाठी जिल्हयात मध्यवर्ती बँकेच्या जवळपास 190 च्यावर शाखा निर्माण केल्या. परंतु दुर्देवाने पदमश्रीच्यानंतर बँक तोटयात आली. परिणामी शेतकरी, कष्टकरी, उद्योगपती व्यावसायिक यांना बँकेच्या व्यवहारात अडचण निर्माण होत होती. नवीन शाखा उघडण्याबाबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.ना.डॉ.भागवत क-हाड यांनी लातूर येथे विभागीय संपूर्ण आग्रनी बँक अधीक्षकांची दि.4 डिसेंबर 2021 रोजी बैठक देखील घेवून तश्या सूचनाही दिल्या. यावेळी देखील खा.प्रतापराव पाटील चिखलीकर बैठकीस उपस्थित राहून नांदेड जिल्हयाची गरज लक्षात आणून दिली.
अलीकडच्या काळात बँकेतून आर्थिक देवाणघेवाणीच्या बाबतीत ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांमध्ये प्रचंड जाणीव जागृती निर्माण झाली आहे . शिवाय कॅशलेस कारभारात मोठी वाढ झालेली असल्याने बँकांची नितांत गरज वाढली आहे .अशा परिस्थितीत जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांची संख्या अत्यंत तोकडी होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना इच्छा असूनही राष्ट्रीयकृत बँकेतून आर्थिक व्यवहार करता येत नव्हते . अशा परिस्थितीत शेतकरी आणि सामान्य नागरिकांनाही राष्ट्रीयकृत बँकांमधून आर्थिक देवाणघेवाणीचे कामकाज चालवता यावे , त्यांना सुलभ आणि चांगल्या पद्धतीची दर्जेदार सेवा मिळावी या अनुषंगाने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिफारशीची मदत केल्यामुळे नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या 25 ते 30 नवीन शाखांची लवकरच सुरुवात होणार आहे. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नामुळे नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्राहकांना आता नवीन राष्ट्रीयकृत बँकांच्या सेवांचा लाभ घेता येणार आहे.