Home नांदेड खा.चिखलीकरांची मकरसंक्रात भोकर मतदारसंघात साजरी…!

खा.चिखलीकरांची मकरसंक्रात भोकर मतदारसंघात साजरी…!

447

महेंद्र गायकवाड 

नांदेड – नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मकरसंक्रांतीचा सण भोकर विधानसभा मतदारसंघातील जनतेसोबत साजरा करण्यासाठी सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद साधला. सणासुदीच्या दिवशी खासदार प्रत्यक्ष आपल्या गावात आल्याचे पाहून नागरीक भारावून गेले होते. गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात भोकर मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा लेखा-जोखा सादर करुन गावच्या विकासासाठी खासदार निधी देण्याचे आश्‍वासन दिल्यामुळे नागरीकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मकरसंक्रांतीचा हा सण भोकर मतदारसंघातील नागरीकांच्या सानिध्यात साजरा करण्याचा निर्णय घेवून खा.चिखलीकर यांनी सकाळी 11 वाजता भोकर विश्रामगृहावर दाखल झाले. भोकर येथील जनता दरबारात नागरीकांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी उपस्थित अधिकार्‍यांना तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचना केल्या. भोकर येथील जनता दरबार आटोपून खा.चिखलीकर हे चिंचाळा, दिवशी (खु), पाळज, किनी, देवठाणा येथील ग्रामस्थांशी थेट संवाद साधून जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी खासदारांनी सर्वसामान्य जनतेसोबत तिळगुळ देवून मकरसंक्रांतीचा सणही साजरा करण्याचा अनोखा प्रयोग भोकर मतदारसंघात झाला.
आजपर्यंत मतदारसंघात सणासुदीच्या दिवशी खासदार-आमदार येवून आमच्या सोबत मकरसंक्रांतीचा सण साजरा करणारे तुम्ही पहिले खासदार असल्याची बोलकी प्रतिक्रिया अनेक नागरीकांनी व्यक्त केली. भोकर मतदारसंघातील गावात खासदार जावून सर्वसामान्य जनतेच्या घरी जावून तिळगुळ देत मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
भोकर तालुक्यातील सुप्रसिध्द असलेल्या पाळज येथील गणपती मंदिरात जावून गणेशाचे दर्शनही खा.चिखलीकर यांनी घेतले. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने खासदारांचे भव्य स्वागत करुन आम्ही न मागता आपण गणपती देवस्थानच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन दिल्याबद्दल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गणेश गंदपवार, गावचे उपसरपंच चाटलावार, माजी उपसरपंच साईनाथ पाळजकर, जि.प.सदस्य दिवाकर रेड्डी यांनी खासदारांचे जाहिर आभार मानले.
पाळज गणेश मंदिराच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात खा.चिखलीकर यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधताना म्हणाले, मी तुमच्यासाठी नवखा असतानाही तुम्ही मला लोकसभेच्या निवडणूकीत भरभरुन आशिर्वाद दिल्यामुळेच देशाचे सर्व्वोच्च सभागृह असलेल्या संसदेत मी जावू शकलो. खासदार म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडून पाळज येथील गणेश मंदिर परिसर विकासासाठी केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाकडून 66 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला आहे.
लोकसभा निवडणूकीच्या काळात मी पाळजला आलो होतो. त्याचवेळी आपणाला शब्द देवून हे गणेश मंदिराला तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. तुमच्या आशिर्वादाने खासदार झाल्यानंतर या देवसस्थानचा समावेश पर्यटन क्षेत्रात करण्यात मला यश मिळाले. जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून 50 लाख रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. त्यानंतर केंद्रीय पर्यटन मंत्रालयात जिल्ह्यातील इतर तीर्थक्षेत्राप्रमाणेच पाळज येथील मंदिरासाठी 5 कोटी रुपयांचा निधी पर्यटन मंत्री किसन रेड्डी यांच्याकडून मंजूर करुन घेतला आहे.
नांदेड जिल्ह्यातील राहेर, बोरी, धनगरवाडी, पाळज या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी 66 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यासाठी राज्य शासनाने त्वरीत या तीर्थक्षेत्र विकासाचे प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारकडे पाठविण्याचे पत्रही केंद्रीय पर्यटन मंत्र्याकडून राज्य शासनाला प्राप्त झाले आहे. या मतदार संघाचा आमदार कोणत्याही पक्षाचा असला तरी मतदारसंघाचा विकास करण्याची जबाबदारी तुमचा खासदार या नात्याने माझीही आहे. विरोधकांनी वैयक्तीक टीकाटिप्पणी न करता विकास कामांची स्पर्धा करावे असे पालकमंत्र्यांचे नांव न घेता आवाहन केले.
खासदाराने केंद्र शासनाकडून पाळज तीर्थक्षेत्र विकासाठी 5 कोटी रुपयांचा निधी खेचून आणण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्याचे पालकमंत्री व भोकर मतदारसंघाचे आमदार या नात्याने अशोकरावांनी पाळज देवस्थानच्या विकासासाठी आणखी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यास खासदार म्हणून मी त्यांचे स्वागत करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन खा.चिखलीकर यांनी पाळज ग्रामस्थांच्या साक्षीने सांगितले. भोकर येथील डॉक्टर मंडळीशी थेट संवाद साधून मकरसंक्रांत साजरी करताना आपण केलेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळातील कामांचा अहवाल साजरा केला. आपला खासदार या नात्याने आपण रेल्वेचे प्रलंबीत असलेले दुहेरी रेल्वे लाईन, नांदेड-मुंबई, नांदेड-पुणे, नांदेड-तिरुपती नविन रेल्वे सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. नांदेड रेल्वे स्टेशन हे मॉडेल रेल्वेस्थानकाचा दर्जा प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागातील जिल्हा बँकेच्या 129 शाखा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या वाढलेल्या अडचणीची सोडवणूक करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा सुरु करण्याची परवानगी आपल्या प्रयत्नामुळे मिळाली आहे. भोकर येथील डॉक्टर असोसिएशनच्यावतीने खा.चिखलीकर यांचा सत्कार डॉ.नाईक व त्यांच्या सहकार्‍यांनी केला. यावेळी डॉक्टरांनी आपल्या भावनाला वाट करुन देताना म्हणाले, कोणतीही निवडणूक नसताना खासदारांनी आम्हा डॉक्टरमंडळीला मकरसंक्रांतीच्या दिवशी बोलावून आमच्याशी हितगुज साधण्याचा खासदारांनी केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
भोकर मतदारसंघात मकरसंक्रात साजरी करण्यासाठी खा.चिखलीकर यांच्या सोबत भाजपा भोकर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर, भोकर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर पाटील लघदुळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राठोड, भाजपाचे प्रवक्ते प्रल्हाद उमाटे, जि.प.सदस्य दिवाकर रेड्डी, भोकर भाजपाचे पदाधिकारी गणेश कापसे, दिलीप सोनटक्के, व्यंकटेश आसरवाड, गजानन ढगे, तुकाराम महादावाड, विषाल माने, श्रीकांत पाटील किन्हाळकर आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.