Home नांदेड कृषी विस्तार अधिकारी सात हजारांच्या लाचेच्या जाळ्यात.

कृषी विस्तार अधिकारी सात हजारांच्या लाचेच्या जाळ्यात.

390

 

प्रतिनिधी : मजहर शेख, नांदेड

नांदेड/माहूर,दि : २४ :- किनवट कृषी विभागातील विस्तार अधिकारी किनवट आणि माहूरचा अतिरिक्त पदभार सांभाळणाऱ्याला आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 7 हजार रुपयांची लाच घेतल्यावर अटक केली आहे. एका 60 वर्षीय व्यक्तीने 21 मार्च रोजी तक्रार दिली की, त्यांच्या पत्नीच्या नावे शेतात मंजुर झालेल्या विहिरीचे बांधकाम पाहणी करून उर्वरीत बिलाची रक्कम मंजुर करण्यासाठी पंचायत समिती किनवटचे कृषी विस्तार अधिकारी संजय घुमटकर हे 10 हजार रुपयांची लाच मागत आहेत. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 22 मार्च रोजी लाच मागणीची पडताळणी केली आणि आज 24 मार्च रोजी तहसील कार्यालय माहुरच्या प्रांगणात तडजोडीनंतर तक्रारदाराकडून 7 हजार रुपयांची लाच स्विकारली. लाच स्विकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती किनवट आणि अतिरिक्त पदभार माहूर संजय एकनाथ घुमटकर (40) यास जेरबंद केले.
याबाबत माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहीपर्यंत सुरू होती. पोलीस अधिक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलीस अधिक्षक धर्मसिंह चव्हाण, पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक कालीदास ढवळे पोलीस अंमलदार संतोष शेटे, किशन चिंतोरे, एकनाथ गंगातीर आणि शेख मुजीब यांनीही प्रक्रिया सुरू केली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती देतांना जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर बोलणे असेल,ऑडीओ, व्हिडीओ असेल, एसएमएस असतील तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असेल तसेच माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती प्राप्त झाली असेल तर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02426-253512 यावर आणि पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांचा मोबाईल क्रमांक 7350197197 सुध्दा माहिती देता येईल तसेच एसीबी विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा याची माहिती देता येईल जनतेने भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही माहिती द्यावी असे आवाहन एसीबी विभागाने केले आहे.