राजेंद्र भांड* ✍️
सिन्नर तालुक्यातील दातली येथे पहिला रिंगण सोहळा उत्साहात संपन्न.
तुझा पाहुनी सोहळा माझा रंगला अभंग गेला शिणवटा सारा मेघ झाले पांडुरंग… नाम निवृत्तीचे घेता डोले पताका डौलात.. अश्व धावती रिंगणी नाचे विठु काळजात …
या उक्तीप्रमाणे शुक्रवार १७ रोजी चार वाजता संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे दातली शिवारात रिंगण तळावर आगमन झाले आणि माऊली माऊली… असा जयघोष करत वारकरी भाविकांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले कैलास शेळके यांच्या साडेतीन एकर क्षेत्रावर या रिंगण सोहळ्याचे दातली ग्रामस्थांच्यावतीने आयोजन केले जाते. दोन तास चाललेल्या या रिंगण सोहळ्यात प्रथम मानाच्या अश्वाचे रिंगण झाले. त्यानंतर पखवाज, झेंडेकरी, विणेकरी, तुळशी असे रिंगण पार पडले पायधूळ मस्तकी लावण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. वारीतील रिंगण सोहळा हा वारकऱ्यांच्या आणि एकूणच वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणाऱ्या भाविक भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो आजच्या डिजिटल आणि यंत्र युगातही रिंगण सोहळा टिकून आहे.
अश्व दौडले दौडले होता टाळमृदुंगाच्या ध्वनी निवृत्तीनाथांच्या जय जय कारे गेले रिंगण रंगुनी असे सुंदर वर्णन रिंगण सोहळ्याची केले आहे. या भव्य सोहळ्याला 50000 भाविकांची उपस्थिती होती. यावर्षी संत निवृत्तीनाथांच्या रथाला नाशिक जिल्ह्यातील मुरंबी येथील गजीराम मते यांची खिल्लारी जोडी सारथ्य करीत आहे. आज आज शनिवार दिनांक 19 रोजी संत श्रेष्ठ निवृत्ती नाथ महाराजांची पालखी नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत हद्द सोडत अहमदनगर जिल्ह्यातील पारेगाव च्या दिशेने प्रस्थान ठेवेल… राम कृष्ण हरी….