नरळद येथील प्रकार
आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर ग्रामस्थांनी मांडले गाऱ्हाणे
गंगाखेड प्रतिनिधी
कसलीही शासकीय सुट्टी नसताना जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी दिवसभर शाळेला कुलूप ठोकत दांडी मारली. शुक्रवारी नरळद येथील पालकांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना शाळेत बोलून घेत हा प्रकार कथन केला.
गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव केंद्र अंतर्गत नरळद येथे जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा आहे. शुक्रवारी सकाळी पालकांनी आपले विद्यार्थी घरीच आहेत हे लक्षात आल्यानंतर शाळेकडे जाऊन चक्कर मारली असता शाळेला कुलूप आढळून आले. त्यानंतर काही ग्रामस्थांनी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना सदर घटनेची माहिती देत शाळेकडे येऊन भेट देण्याची विनंती केली. मसनेरवाडीचे माजी सरपंच जयदेव मिसे, वाघलगाव चे माजी सरपंच नारायणराव घनवटे यांनी शाळेकडे जाऊन पालक व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. ग्रामस्थ पालक व उपस्थित कार्यकर्त्यांनी कॅलेंडर वर पहात आज कसलिही सुट्टी नसल्याची खात्री करून घेतली. पण शाळा मात्र बंद आढळली . मागील दोन वर्षे कोरोना संकटामुळे शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले .यावर्षी शाळेत अधिकचे क्लास घेणे तर दूरच पण नियमित वेळेतही शिक्षक शाळेस दांडी मारून जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला. आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते शाळेचे आवारात आले असता विद्यार्थ्यांनीही एकच गर्दी करून आपल्या व्यथा सांगितल्या. अशाच कारणामुळे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊन हे विद्यार्थी खाजगी शाळेत जात असल्याची माहिती ही पालकांनी दिली .एकूणच या प्रकाराची शिक्षण विभागाने चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थ व पालकाकडून होत आहे.