Home मराठवाडा जांबसमर्थ सह परिसरातील ग्रामस्थ घनसावंगी पोलीस स्टेशनवर धडकणार

जांबसमर्थ सह परिसरातील ग्रामस्थ घनसावंगी पोलीस स्टेशनवर धडकणार

483

 

ठिय्या आंदोलन : गावात महिलांचे चूल बंद आंदोलन
मूर्ती चोरी प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक पवित्र्यात

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या देवघरातील श्रीरामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मणासह अन्य सहा मूर्तींची चोरी होऊन नऊ दिवस लोटले आहेत. परंतू अद्यापपर्यंत पोलीसांच्या हाती काहीच न आल्याने समर्थभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्‍वभूमीवर जांबसमर्थ सह परिसरातील ग्रामस्थ घनसावंगी पोलीस स्टेशनवर धडकणार आहेत.
पोलीसांनी लवकरात लवकर आरोपींना पकडून कडक शासन करावे या प्रमुख मागणीसाठी मंगळवार, दि.30 ऑगस्टरोजी जांबसमर्थ सह परिसरातील नागरिक घनसावंगी पोलीस स्थानकात ठिय्या आंदोलन करणार असून ज्यावेळी ठिय्या आंदोलन चालू होईल त्याचवेळी जांब गावात श्रीराम मंदिरात देखील महिला मंडळ चूल बंद आंदोलन करणार आहेत. जांब हे समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव, त्यामुळे तेथे त्यांच्या पूर्वजांपासून असलेल्या प्राचीन श्रीरामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मणाच्या मुर्त्यांसह अन्य 6 मूर्तींची चोरी गेल्या आठवड्यात रविवारी पहाटे झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या चोरीने समर्थभक्तांसह प्रभू रामचंद्रांच्या भक्तांमध्ये संताप व्यक्त केला गेला. हा प्रश्‍न विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही आ.राजेश टोपे यांनी मांडला होता त्यानंतर तपासाची गती वाढणे अपेक्षीत होते परंतू तसे झालेच नाही. पोलिसांना जाब विचारला असता आमचा तपास चालू आहे, लवकरच चोर हाती लागतील असा विश्‍वास व्यक्त केला जात होता. परंतू त्याला आता 8-10 दहा दिवसांचा कालावधी होऊन गेला अद्यापही परिस्थिती जैसे थे च आहे. ग्रामस्थांचा वाढता रोष पाहता ही परिस्थिती प्रशासनाने गांभीर्यपूर्वक हाताळावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील गावकर्‍यांनी बोलून दाखवला आहे.
जांबसमर्थ येथील आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत समर्थ रामदास स्वामींचे वंशज प.पू.भूषण स्वामी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच बाळासाहेब तांगडे, प्रा.भाऊसाहेब देवकर, राजकुमार वायदळ, विलास तांगडे, राजेंद्र तांगडे, किशोर मुनेमाणिक, अंबादास अंभोरे, अक्षय तांगडे यांच्यासह असंख्य ग्रामस्थांची उपस्थिती होतीे.

हे ही वाचा
—————
पोलिस प्रशासनाला आमचे सहकार्यच
आमचे अजूनही पोलिस प्रशासनाला संपूर्णतः सहकार्यच आहे. परंतू शोध मोहिमेमध्ये कुठलाही खंड पडता कामा नये. जांब गावचे चैतन्य पूर्णतः हरपले असून आम्हाला आमचे चैतन्य पुन्हा बहाल करावे. लवकरात लवकर नराधमांना पकडून त्यांना कडक शासन करावे अशीच आमची मागणी आहे. पोलिस प्रशासन त्यांचे काम अत्यंत चोखपणे बजावत आहे. परंतू या शोधमोहिमेला गती यावी यासाठी हे आंदोलन करावे लागत आहे.
– प.पू.भूषण स्वामी

अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करणार
गेल्या आठ दहा दिवसांपासून पोलिस प्रशासन काम करत आहे. परंतू पाहिजे तसा कोणताच तपास त्यांच्याकडून होतांना दिसत नाही. आम्ही त्यांना वेळोवेळी मदतही केली आहे. परंतू पदरी निराशाच पडत आहे. अत्यंत वरिष्ठ पातळीवर याचा तपास करावा अन्यथा आम्ही आमचे आंदोलन अधिक तीव्र करू. तसेच आज आम्ही केवळ ठिय्या देत आहेत यानंतर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी.अशी माहिती बाळासाहेब तांगडे (सरपंच, श्रीक्षेत्र जांबसमर्थ) यांनी दिली.