यवतमाळ प्रतिनिधी : जल, जंगल, जमिन, जन आणि जानवर या पंचजात सेवारत असलेल्या संस्थांचे यवतमाळात पेड, पानी, प्लास्टीक या विषयात सक्रीयपणे कार्य सुरु आहे. भविष्यातही उपरोक्त विषयांत एकत्रितपणे पर्यावरण रक्षेचे कार्य करण्याचा संकल्प यवतमाळकर संस्थांनी घेतला. निमीत्त होते पर्यावरण संरक्षण गतीविधी अंतर्गत निळोणा येथील सभागृहात झालेल्या संस्थांच्या दिपावली स्नेहमिलन चिंतन बैठकीचे. मंगळवारी गुरुनानक जयंतीदिनी झालेल्या या कार्यक्रमाला जिल्ह्यातील निसर्ग रक्षणार्थ अग्रेसर असलेल्या संस्था, संघटनांचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतमातेचे पुजन करुन सुरु झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पर्यावरण संरक्षण गतीविधीचे विभाग संयोजक संतोष मुत्यलवार यांचेसह नेर येथील प्रभाकरराव गुल्हाने आणि मातोश्री वृध्दाश्रमाचे सुनिल खातखेडकर आणि प्रवीण बंडेवार उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणातुन संतोष मृत्यलवार यांनी संस्थांच्या माध्यमातुन यवतमाळातील पर्यावरण विषयक समस्या या संस्थांच्या एकत्रीकरणातुन सुटाव्यात याकरिता सर्वांना आवाहन केले. सामाजिक जीवनीतुन निसर्गाच ऋण फेडण्यासाठी संस्थेच्या माध्यमातुन मिळालेल्या संधीचे सोने करुन उज्वल राष्ट्रनिर्मीतीत प्रत्येकाचा हातभार लागावा असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी संस्थांचे नियमीत एकत्रीकरण, वैचारिक मंथन, कल्पनांची देवाण घेवाण, उपक्रमांमधील परस्पर सहकार्य, नावीन्यपुर्ण व तातडीच्या विषयातील अग्रक्रमता, सेवाकार्यातील सुरक्षा अशा अनेक विषयांवर संस्थेच्या प्रतिनिधींचे मार्गदर्शन वजा चर्चा झाली.
सर्वश्री अजय मुंधडा (अध्यात्मिक मंच) करुणा धनेवार (अस्तीत्व) सुमेध कापसे (ओलावा) प्रतिक तराळकर (युनीटी) दिनेश तिवाडे (जाणीव) अपुर्वा शर्मा (लिटील पॉज) भुषण क्षीरसागर (यवतमाळ प्लॉगर) संजय देशपांडे (शैक्षणिक मंच) अश्विन सवालाखे (एसएल फाउंडेशन) अभीजीत गुल्हाने (बी काइंड) जय कारिया (क्रिकेट क्लब) वसंत उपगनलावार (प्रयास) राहुल दाभाडकर (संकल्प) दुर्गा पटले (कलाकुंज) आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या संस्थांचे कार्य, भुमिका, उद्देश उपस्थितांसमोर विषद केले. स्फुरणगीत आणि सादरीकरणानंतर झालेल्या टाळ्यांच्या गजराने उपस्थित असलेल्या सेवाकर्त्यांचा उत्साह दुणावला होता. नेर येथील पर्यावरण सेवक रमेशराव सामुद्रे यांनी पर्यावरण आधारित चारोळ्या, कविता, घोषवाक्ये सांगत उपस्थितांमध्ये सेवाधर्माच्या विस्तारकार्याचा संदेश दिला. सुत्रसंचालन करुन संतोष भोयर यांनी आभार मानले. बैठकीला नगर संयोजक संकल्प डांगोरे यांचेसह तालुक्यांमधुन आलेल्या संयोजकांनी आयोजनाकरिता सहकार्य केले.