Home विदर्भ मैत्रिणींसमोर छेड काढल्याने शालेय विद्यार्थिनीची आत्महत्या

मैत्रिणींसमोर छेड काढल्याने शालेय विद्यार्थिनीची आत्महत्या

197

पोस्को व ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल..!

अमीन शाह

बुलडाणा , दि. ३१ :- मैत्रिणींसमोर छेड काढल्याने त्याचा अपमान सहन न झाल्याने 16 वर्षीय शालेय विद्यार्थिनीने घरी पोहोचल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वडाळी तालुका मेहकर येथे गुरुवार दिनांक 30 जानेवारी 2020 रोजी घडली असून अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा व अनुसूचित जाती व जमाती अत्याचार विरोधी कायद्यानुसार सुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावा या मागणीसाठी नातेवाईक प्रेत घेऊन जानेफळ पोलीस स्टेशनला पोहचल्याने अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध बाल लैंगिक शोषण विरोधी कायद्या सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर रात्री उशिरा वडाळी येथे त्या विद्यार्थिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर असे की वडाळी तालुका मेहकर येथील 16 वर्षीय तरुणी उंद्री तालुका चिखली येथील शिवाजी हायस्कूल मध्ये इयत्ता दहाव्या वर्गात शिक्षणासाठी दररोज अप-डाऊन करीत असतांंना काल दिनांक 30 जानेवारी 2020 रोजी सराव परीक्षेचा पेपर देऊन घरी परत जाण्यासाठी सकाळी 10:30 वाजेदरम्यान उंद्री तालुका चिखली येथील बस थांब्यावर मैत्रिणी समवेत एस टी बसची वाट पाहत उभी असतांंना तेथे महादेव सीताराम देवकर वय 22 वर्ष राहणार वडाळी तालुका मेहकर याने मोटर सायकल घेऊन जात तिला ‘चाल माझ्या गाडीवर बस मी तुला घरी सोडून देतो’ असे म्हटले त्यामुळे मैत्रिणींसमोर अपमान झाल्याचे सहन न झाल्यामुळे तिने घरी पोहोचल्यानंतर आपल्या आजोबांना सदर प्रकार सांगितला असता तिचे आजोबा हे महादेव सीताराम देवकर याच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले असतांंना त्या शालेय विद्यार्थिनीने घराचा दरवाजा बंद करीत घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आजोबा घरी परत आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा बंद दिसल्याने तो उघडण्यासाठी आवाज दिला परंतु घरातून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडला असता त्यांना आपली नात गळफास घेतलेल्या आवस्थेत लटकलेली आढळून आली त्यामुळे त्यांनी आरडाओरड करताच शेजारील सर्वच लोक धावत आले आणि त्यांनी त्या विद्यार्थिनीला प्रथम उंद्री येथील रुग्णालयात व तेथून चिखली येथे उपचारार्थ हलविले असतांंना तेथे मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे चिखली येथे तिच्या प्रेताचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रेत वडाळी येथे घेऊन जात असतांना पोलिसात तक्रार देण्यासाठी जानेफळ येथे आलेल्या तिच्या आजोबांंना सोबत घेऊन जाण्यासाठी सर्व नातेवाईक प्रेतासह जानेफळ पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर त्यांना याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध केवळ आत्महत्येस प्रवृत्त केल्याचाच गुन्हा दाखल केल्याची माहिती समजल्याने त्यांनी रोष व्यक्त करीत आरोपीविरुद्ध तात्काळ बाललैंगिक विरोधी कायदा तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार सुद्धा गुन्हे दाखल करण्याची मागणी केली त्यामुळे ठाणेदार दिलीप मसराम यांनी वरिष्ठांशी संपर्क करीत चर्चा केल्यानंतर सदर विद्यार्थिनीच्या वडिलांचे जबाब नोंदवून घेण्यात आले व त्यावरून बाल लैंगिक विरोधी कायदा तसेच ॲक्ट्रॉसिटी ॲक्ट नुसार सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे समाधान झाल्यानंतर विद्यार्थिनीचे प्रेत घेऊन नातेवाईक वडाळी येथे रवाना झाले व रात्री उशिरा वडाळी तालुका मेहकर येथे अंत्यसंस्कार पार पडले.
सदर घटनेमुळे शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून अशा घटनांना आळा बसण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तात्काळ पावले उचलण्याची मागणी होत आहे .