अमीन शाह
रिसोड तालुक्यातील एका महिलेचे आपल्या आते भावासोबत अवैध संबंध होते.या अवैद्य संबंधात अडसर ठरत असलेल्या नवर्याचा प्रियकराच्या मदतीने गळा आवळुन संपवण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आण्णासाहेब नावाचे एक ३५ वर्षीय व्यक्ती पत्नी,२ मुली व एका मुलासह तालुक्यात येथे राहतात.बायकोचे तिच्या आते भावासोबत अवैध संबंध होते.यावरून पती आणि पत्नीत नेहमीच खटके उडायचे.त्यामुळे आण्णासहोबांचे आई-वडीलही नाराज होते आणि सुनेच्या या प्रेम प्रकरणाला विरोध करायचे.काही दिवसांपुर्वी याच गोष्टीवरून आण्णासाहेब आणि बायकोच्या प्रियकरामध्ये भांडण झालं होतं.
२० ऑगस्ट रोजी रिसोड तालुक्यातील बिबखेडा या गावी मिस्त्री कामासाठी मुलगा गेला असता रात्री उशिरापर्यंत घरी परत आला नसल्याने आण्णासाहेबांच्या वडिलांनी सुनेकडे विचारणा केली असता त्यांच्याकडुन कोणतीही महिती मिळाली नाही.रात्र उलटुनही तरी तो परत आला नसल्याने गावातील लोकांनी त्यांचा शोध सुरू केला.
गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने रिसोड,बीबखेडा येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता प्रियकराने त्याला दुचाकीवरून रिसोडकडे नेल्याची बाब उघड झाली.हा प्रकार प्रियकराला समजताच त्याने स्वतःला शिरपुर पोलिसांच्या स्वाधीन केले आणि पोलिसांसमोर कबुलीही दिली.शिरपुर पोलिसांनी प्रियकराला रिसोड पोलिसांच्या ताब्यात दिलं.या प्रियकर आणि प्रियसीने पतीचा गळा आवळुन त्याला रिसोड लोणी मार्गावरील एका ढाब्यापासुन काही अंतरावर असलेल्या झुडपात फेकुन दिलं असल्याची कबुली दिली.
यावरून पोलिसांनी घटनास्थळ धाव घेत जखमी अवस्थेत पतीला रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात केले.मात्र,त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना वाशीम येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.याबाबत आण्णासाहेबांच्या वडिलांनी रिसोड पोलिसात तक्रार दिल्याने सुन आणि तिच्या प्रियकराविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.