➡️ अर्जदार सुनंदा कुडमेथे व ईतरांचा अर्ज नामंजूर..!
( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी, 25 डिसेंबर :- घाटंजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चिखलवर्धा येथील सरपंच वर्षा भिमराव कनाके हिच्या विरोधात गावातीलच राजकीय विरोधकांनी तिने शासकीय जमीनीवर अतिक्रमण केल्याचा मुद्दा समोर ठेवून अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सरपंच वर्षा कणाके हिला 14 जुलै रोजी अपात्र घोषित केले होते. परंतु; सरपंच वर्षा कणाके हिने अमरावतीचे अप्पर आयुक्त निलेश सागर यांच्या न्यायालयात अपील दाखल केले. सदर प्रकरणात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून 9 डिसेंबर रोजी सरपंच वर्षा कनाके हिला ग्रामपंचायत सरपंच पदी कायम ठेवत असल्याचा आदेश 9 डिसेंबर रोजी पारीत केला. अपीलकर्ता सरपंच हिची बाजु ॲड. मधूसुदन माहोरे (अमरावती) यांनी मांडली.
यवतमाळ येथील अपर जिल्हाधिकारी न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सरपंच वर्षा कनाके हिने अप्पर आयुक्त निलेश सागर यांच्या न्यायालयात अपील दाखल केले होते. त्या अनुषंगाने अप्पर आयुक्त निलेश सागर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहून मोका पाहणीचा अहवाल मागितला. त्यावेळी वर्षा कनाके यांनी आपल्या वकीलामार्फत घरासमोर असलेले सार्वजनिक हद्दीतले काटेरी कुंपण हे घरासमोरून गावातील जनावरे जंगलात चारण्याकरिता जात असल्याने त्या ठिकाणी लागवड केलेले सिताफळ, उंबर व इतर फळाच्या झाडांचे संगोपन करण्याच्या दृष्टीने काटेरी कुंपण करण्यात आल्याचे सांगितले. विशेष म्हणजे ग्रामपंचायत सचिव यांनी तशी कोणतीच सूचना सरपंचाना दिली नाही.