सुपारी देऊन नवऱ्यालाच संपवला ,
अमीन शाह
काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यात गाड्या खरेदी विक्री व्यवसाय करणारे व्यावसायिक अमित आप्पासाहेब भोसले ( वय 38 राहणार शुक्रवार पेठ सातारा ) यांची मैत्रिणीसोबत जेवण करून हॉटेलमधून बाहेर निघत असताना अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आलेली होती. या घटनेनंतर सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार अनैतिक संबंधातून झाल्याचे देखील समोर आलेले होते मात्र या प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यानंतर जे काही सत्य समोर आले त्यावर सुरुवातीला पोलिसांचा देखील विश्वास बसत नव्हता.
उपलब्ध माहितीनुसार , सदर हत्या ही अमित भोसले यांच्या पत्नीनेच सुपारी देऊन घडवून आणल्याचे समोर आलेले असून धक्कादायक बाब म्हणजे त्यांची पत्नी ही महिला पोलीस कर्मचारी आहे. शुभांगी अमित भोसले असे मयत व्यक्ती यांच्या पत्नीचे नाव असून या गुन्ह्यात सात जणांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील वाडे फाट्यावर 24 जानेवारी रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास मैत्रिणीसोबत जेवण्यासाठी गेलेले असताना त्यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या मात्र त्यातून ते वाचल्यानंतर गळा चिरून त्यांचा खून करण्यात आलेला होता.
पोलीस तपासात सदर हत्येची सुपारी ही त्यांच्या पत्नीनेच दिल्याचे समोर आलेले असून खून करणारी टोळी ही सराईत असल्याचे देखील समोर आलेले आहे. अभिषेक विलास चतुर ( वय 27 राहणार नांदगिरी जिल्हा सातारा ), शुभम हिंदूराव चतुर ( वय 27 राहणार कोरेगाव ), राजू भीमराव पवार ( वय 26 राहणार सातारा ), सचिन रमेश चव्हाण ( वय 22 राहणार मुळशी पुणे ), सुरज ज्ञानेश्वर कदम ( वय 27 राहणार सातारा ) अशी आरोपी व्यक्तींची नावे आहेत तर एक मुलगा अल्पवयीन असल्याची माहिती आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या प्रकरणी पत्रकार परिषदेत माहिती दिली .