Home यवतमाळ घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापती विरुद्ध अपील प्रकरणात अमरावती...

घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापती विरुद्ध अपील प्रकरणात अमरावती येथील सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधक यांचे न्यायालयात 8 ऑगस्ट रोजी सुनावणी..!

67
(अयनुद्दीन सोलंकी,)
————————-
घाटंजी : घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन अशोक कोठारी (यवतमाळ), उपसभापती सचिन सुभाषचंद्र देशमुख पारवेकर (पारवा) यांची निवड प्रक्रिया ही अनेक नियमांना डावलून बेकायदेशीर करण्यात आली असून ती प्रक्रिया रद्द करुन पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापतींची निवड करण्यात यावी, अशी मागणी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक अभिषेक ठाकरे, दि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पांढरकवडा विभागीय अध्यक्ष तथा संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष सुरेशबाबु लोणकर व इतर संचालकांनी अमरावतीच्या सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधक विनायक कहाळेकर यांच्या न्यायालयात केली होती.
परंतु, सदर प्रकरणात 2 जुन रोजी यवतमाळ येथील जिल्हा सहनिबंधक सहकारी संस्था येथे सुनावणी घेण्यात आली. त्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे व ईतर 7 संचालकाचे अपील यवतमाळचे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी प्रकरण खारीज केले. या मुळे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी नितीन कोठारी, उप सभापती पदी सचिन देशमुख पारवेकर हे पदावर कायम आहे.
घाटंजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिषेक ठाकरे (आमडी), आशिष लोणकर (शिरोली), आशिष भोयर (अंजी (नृ.)), गुणवंत लेणगुरे (मानोली), अरविंद जाधव (घाटंजी), अकबर तंवर (घाटंजी), रमेश डंभारे (आमडी) व कैलास कोरवते (शिरोली) आदींनी प्राधिकृत अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती एस. व्ही. कुडमेथे, सभापती भैय्या उर्फ नितीन कोठारी, उप सभापती सचिन देशमुख पारवेकर यांचे विरुद्ध यवतमाळचे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांचे कडे अपिल दाखल केले होते. सदर अपील खारीज करण्यात आल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक ठाकरे व ईतर 7 संचालकांनी अमरावतीच्या सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधक विनायक कहाळेकर यांच्या न्यायालयात जिल्हा सहनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ यांच्या आदेशाविरुद्ध अमरावती न्यायालयात अपील दाखल केले आहे. सदर प्रकरणाची सुनावणी 8 ऑगसट रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे.
विशेष म्हणजे अमरावती विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था न्यायालयाकडुन योग्य न्याय न मिळाल्यास सदर प्रकरणात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा माजी सभापती अभिषेक ठाकरे व इतरांनी दिला आहे.
सदर प्रकरणाची सुनावणीची नोटीस अमरावती येथील सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधक विनायक कहाळेकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे (रा. आमडी), दि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पांढरकवडा विभागीय अध्यक्ष व संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष सुरेशबाबु लोणकर (रा. शिरोली), आशिष भोयर (रा. अंजी (नृसिंह)), गुणवंत लेणगुरे (रा. मानोली), सर्विद जाधव (रा. घाटंजी), अकबर तंवर (रा. घाटंजी), रमेश डंभारे (रा. आमडी), कैलास कोरवते (रा. शिरोली) आदीं संचालकांना बजावण्यात आली आहे.
दरम्यान, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या आदेशानुसार, कृषी उत्पन्न बाजार समिती पदाची निवड करिता उपविधी क्रमांक 36 व 41 मधील तरतुद लागू होत नसुन प्राधिकृत अधिकारी तथा पिठासीन अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिन कुडमेथे यांना प्राप्त विवेकाधिकाराचा (Discretionary Power) वापर करून सभापती व उपसभापती पदासाठी बहुमताने आवाजी मतदान घेण्याच्या नितीन कोठारी व इतर 9 संचालक यांचा अर्ज मंजूर करण्याचा निर्णय योग्य आहे. त्यामुळे सभापती व उपसभापती निवडीच्या विधिग्रह्याते बाबत दाखल वादी यांचा दावा कायदेशीररित्या अयोग्य असुन फेटाळने क्रमप्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 22 (4) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नानासाहेब चव्हाण, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ वादी श्री. अभिषेक ठाकरे व ईतर 7 संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, घाटंजी यांचा दिनांक 19 मे रोजीचा अपील अर्ज खारीज करण्यात येत असुन प्रतिवादी क्रमांक 1 यांनी दिनांक 19 मे रोजीचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती पदाची निवड सभा वैद्य असल्याचे जाहीर करीत आहे, असा आदेश यवतमाळचे सहकारी संस्थेचे जिल्हा उप निबंधक नानासाहेब चव्हाण यांनी पारित केला आहे.
दरम्यान, सदर आदेशाविरुद्ध कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक ठाकरे, दि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पांढरकवडा येथील विभागीय अध्यक्ष तथा संचालक आशिष सुरेशबाबु लोणकर सह आठ संचालकांनी अमरावतीच्या सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधक विनायक कहाळेकर यांच्या न्यायालयात अपील दाखल केले आहे.
या मुळे अमरावती येथील विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था न्यायालयात काय निकाल लागेल, याची उत्सुकता घाटंजी तालुक्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे. सदर प्रकरणाची सुनावणी 8 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता अमरावती येथे होणार आहे.