प्रवाशांनी केला चालक व वाहकांचा भावपुर्ण सत्कार
फुलचंद भगत
वाशिम – प्रवाशांनी भरलेली बस घाटामधुन आपल्या मर्यादीत वेगाने चालली तोच समोरुन सुसाट वेगाने आलेला ट्रक. घाटाच्या एका बाजुला विशालकाय दरी तर दुसर्या बाजुला डोंगरदर्या. साक्षात यमदुताच्या रुपात आलेल्या ट्रकने बसमधील प्रवाशांच्या जीवाची पर्वा न करता सुसाट वेगाने बसला जीवघेणा कट मारला आणि प्रवाशांनी श्वास रोखून धरला. अशा आणीबाणीच्या वेळेस चालकाने आपले संपूर्ण कसब पणाला लावले आणि बस दरीच्या बाजुला असलेल्या लोखंडी सुरक्षा जाळीला टेकवली आणि होणारा भिषण अपघात केवळ चालकाच्या सतर्कतेमुळे टळला. बुधवार, १८ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडलेली व अंगावर काटे आणणारी ही थरारक आपबीती चालकाच्या बाजुलाच बसलेले प्रवाशी आणि शिवछत्रपती आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे पदाधिकारी किशोर वाघमारे यांनी सांगीतली.
या घटनेची थोडक्यात माहिती अशी की, १८ ऑक्टोंबरला सकाळी वाघमारे हे माहुर ते जळगाव या बसमध्ये वाशिमला येण्यासाठी बसले. ही बस आपल्या मर्यादीत वेगाने मार्गक्रमण करत छोटी मारवाडी घाटात पोहोचली असता समोरुन सुसाट वेगाने येणार्या सिमेंट व केमिकलने भरलेल्या ट्रकने या बसला जीवघेणा कट मारला. व त्याच वेगाने विरुध्द दिशेने निघून गेला. मात्र आधीच अरुंद रस्ता व बाजुला मोठी दरी असल्यामुळे मोठा अनर्थ होईल या भितीने प्रवाशांच्या छातीत धडकी भरली. मात्र अशाही परिस्थितीत भांबावुन न जाता चालक प्रकाश अहिरे यांनी प्रसंगावधान राखत दरीच्या बाजुला असलेल्या लोखंडी सुरक्षा जाळीला आपली बस टेकवली आणि बसमधील प्रवाशांचा जीव भांडयात पडला. अशावेळी थोडी जरी चुक झाली असती तर बस सरळ दरीत कोसळली असती. घडलेला प्रकार ‘याची देही याची डोळा’ पाहणारे किशोर वाघमारे यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रमुख दिलीप मेसरे यांना कळविला. बस वाशिम आगारात पोहोचताच दिलीप मेसरे, किशोर वाघमारे, सुखदेव राजगुरु यांनी चालक प्रकाश अहिरे आणि वाहक किशोर चव्हाण यांचा शाल व श्रीफळ देवून भावपुर्ण सत्कार केला आणि केवळ तुमच्या सतर्कतेमुळेच प्रवाशांचे जीव वाचले याबद्दल त्यांचे शब्दसुमनांनी आभार मानले. या सत्कारादरम्यान प्रवाशांनी सुध्दा टाळ्यांच्या प्रचंड गडगडाटात चालक व वाहकाच्या कार्याचे कौतूक केले. यावेळी आगार प्रमुखांसह आगारातील कर्मचारी उपस्थित होते. राज्य परिवहन महामंडळात सेवा बजावत असतांना चालक व वाहक कठीण प्रसंगी सावधगिरी बाळगून आपल्या जीवाची बाजी लावून प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडतात. केवळ त्यांच्यामुळेच एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास ही म्हण अशावेळी खरी ठरते.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206