Home यवतमाळ प्रोत्साहन अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना आचारसंहितेच्या पूर्वी लाभ मिळावा -शेतकरी नेते सचिन मनवर...

प्रोत्साहन अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना आचारसंहितेच्या पूर्वी लाभ मिळावा -शेतकरी नेते सचिन मनवर यांची मागणी

12

यवतमाळ ता.२४ :सेवा सोसायटीतील कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांची माहितीच प्रोत्साहन योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली नाही. त्याचा फटका बसत तब्बल २२ हजारांवर शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या शेतकऱ्यांना विधानसभा आचारसंहितेच्या पूर्वी लाभ मिळावा, अशी मागणी शेतकरी नेते सचिन मनवर यांनी केली आहे.

कोरडवाहू पीकपद्धती, पारंपरिक पिकांवरील अवलंबित्व अशा अनेक कारणांमुळे वाढते नैराश्य व त्यातून होणाऱ्या शेतकरी आत्महत्या या साऱ्याच्या परिणामी शेतकरी आत्महत्याग्रस्त अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे.याच जिल्ह्यात जिल्हा बँक अंतर्गत असलेल्या सेवा सोसायटीच्या कारभारापायी शेतकऱ्यांवर कर्ज भरणा केल्यानंतर मिळणाऱ्या प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. राज्य शासनाने दोन लाखांवर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली होती.त्याबरोबरच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्त योजनेतूनच ५० हजार रुपये प्रोत्साहनपर देण्याची तरतूद करण्यात आली होती.

कोट—–
कर्जदार शेतकऱ्यांना यापूर्वीच कर्जमाफी मिळाली.मात्र नियमित कर्ज भरणाऱ्यांना अद्याप प्रोत्साहन अनुदान देण्यात आले नाही. त्यावरूनच शासनाच्या दुटप्पी धोरणाचा पर्दाफाश होतो. नियमित कर्ज भरू नका ! कदाचित असेच या शासनाला अपेक्षित आहे. त्यामुळेच प्रोत्साहन योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरण्यात येत आहेत.
-सचिन मनवर,शेतकरी नेते,यवतमाळ.