Home यवतमाळ खरंच आपल्या लाडक्या बहिनीला वाचवेल का उपमुख्यमंत्री?

खरंच आपल्या लाडक्या बहिनीला वाचवेल का उपमुख्यमंत्री?

23

मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण ‍ सुनयनाची प्रकृती खालावली

-उपोषणाचा तिसरा दिवस, शासन, प्रशासनाकडून दुर्लक्ष

यवतमाळ, दि.24 : येथील महात्मा फुले चौकात, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्या समोर ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ अन्नत्याग आंदोलन करीत असलेल्या मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण सुनयना संजय येवतकर (अजात) यांची तिसऱ्या दिवशी प्रकृती खालावली आहे. त्यांच्या रक्तातील साखर कमी झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. तसेच अन्नत्याग आंदोलनाला तीन दिवस झाल्यानंतरही शासन आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गात मराठ्यांचा समावेश करण्यात यावा, यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहे, तर दुसरीकडे ओबीसी प्रवर्गामध्ये मराठ्यांचा समावेश करण्यात येऊ नये, अशी मागणी ओबीसी नेत्यांकडून केली जात आहे. त्यासाठी देखील उपोषण सुरू आहे. नवनाथ आबा वाघमारे, मंगेश ससाने व प्रा. लक्ष्मण हाके हे जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषणास बसले आहेत. ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला समाविष्ट करू नये, तसेच देशभरातील ओबीसीची जनगणना करण्यात यावी, यासाठी हे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाचे समर्थन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या महिला जिल्हा अध्यक्ष, तसेच समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष, तसेच सामाजिक कार्यकर्त्या, ओबीसिंच्या नेत्या सुनयना येवतकर (अजात) यांनी रविवार, दि. 22 पासून सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला विविध संस्था व संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. एकूण 375 जातींचा समावेश असलेल्या इतर मागासवर्ग प्रवर्गात (ओबीसी) मराठा समाजाचा समावेश करू नये, देशभरातील ओबीसीची जनगणना करावी, यासह इतर मागण्यांसाठी सुनयना येवतकर यांनी अन्नत्याग आंदोलन केले आहे. मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहीण योजनेच्या केळापूर-आर्णी मतदारसंघाच्या त्या शासकीय सदस्य आहेत. एवढेच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे ‘मुख्यमंत्री : लाडकी बहीण योजने’च्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आले असता सुनयना येवतकर यांनी भाऊ म्हणून तिघांनाही राखी बांधली होती. तसेच तिन्ही भावांना महिलांच्या सुरक्षेची ओवाळणी मागितली होती. त्याच सुनयना येवतकर जेव्हा अन्नत्याग आंदोलन करीत आहे, त्यांची प्रकृती खालावली आहे, अशा प्रसंगी मात्र या तिन्ही भावांचे तिच्याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याची प्रतिक्रिया उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या विविध संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.

चौकट
अन्नत्याग आंदोलनावर ठाम!
रविवारपासून उपोषणास बसलेल्या सुनयना संजय येवतकर (अजात) यांची मंगळवारी प्रकृती खालावली. येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला. तर तीन दिवसापासून अन्नत्याग केल्याने त्यांना कमजोरी आली असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. परंतु, त्या उपोषणावर ठाम आहेत.