Home यवतमाळ शाळेच्या भ्रष्टाचाऱ्यांची प्रशासनाकडून पाठराखण डिजिटल आरोपींचा गुरुदेव शोध लावणार प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठांकडे...

शाळेच्या भ्रष्टाचाऱ्यांची प्रशासनाकडून पाठराखण डिजिटल आरोपींचा गुरुदेव शोध लावणार प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा

12

यवतमाळ : शाळेला डिजिटल करण्यासाठी आलेल्या शासकीय निधीला परस्पर हडपण्यात आल्याचा दाट संशय आहे.परंतु यातील भ्रष्टाचाऱ्यांची प्रशासनाकडून पाठराखण होत असल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे.शिक्षणाधिकारी असो की जिल्हाधिकारी सर्वचजण यातील आरोपींना पाठीशी घालत असल्याने गुरुदेव युवा संघाने या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावर सुरु केला आहे.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती उपयोजनेतून २०२३ -२४ या वर्षासाठी शहरातील दोन शाळांना डिजिटल करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. अण्णाभाऊ साठे नागरी अनुसूचित जाती वस्ती सुधार योजनेतून पालिकेने १ कोटी ९८ लाख १८ हजार ९०८ रुपयांचा निधी वळता केला. यामध्ये मातोश्री रमाबाई आंबेडकर शाळा क्रमांक ६ तसेच नेताजीनगरातील अण्णाभाऊ साठे शाळा क्रमांक १२ या शाळा डिजिटल होणार होत्या परंतु वर्षभरापासून या शाळेला अद्याप डिजिटल स्वरूप आले नाही. २४ मार्च २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली असतांना शाळेवर खर्च करण्यात आला नसल्याने हा निधी परस्पर हडपण्यात आला,असा दाट संशय गुरुदेव युवा संघाकडून व्यक्त करण्यात येत आहे.निधीमध्ये घोळ झाल्यास गुरुदेव यातील भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही,असा दमदेखील गेडाम यांनी भरला आहे. मागील दीड वर्षांपासून डिजिटल वर्गखोल्यांसाठी आलेले कॉम्प्युटर्स धूळखात पडले आहेत गरिबांच्या लेकरांची अशी थट्टा पालिकेकडून होत असल्याने याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला.यातील दोषींना पाठीशी का घालण्यात येत आहे याचा पत्तादेखील गुरुदेव युवा संघाकडून लावल्या जाईल,आरोपींना जेरबंद केल्याशिवाय गुरुदेव स्वस्थ बसणार नाही,अशी तंबीदेखील गुरुदेव यांनी निवेदनातून दिली. संघाचे उपाध्यक्ष भाऊराव वासनिक, सुहास कांबळे, जगन,रितेश चौधरी,बाबूलाल, तसेच सामरी उपस्थित होते.

शिक्षणाधिकारी गप्प असल्याने संशयाला वाव

दोन शाळांना डिजिटल करण्यासाठी आलेल्या निधीत भ्रष्टाचार बोकाळल्याचा संशय गुरुदेव युवा संघाकडून व्यक्त केल्या जात आहे या प्रकरणात शिक्षणाधिकारी गप्प असल्याने संशयाला वाव मिळत आहे.डिजिटल शाळेचा गवगवा करण्यातच शिक्षण विभाग पुढे आहे प्रत्यक्षात याचा फायदा विद्यार्थ्यांना होताना दिसत नाही तरीही यावर कोट्यवधी खर्च केले जात आहे शहरातील दोन शाळांना डिजिटल करण्यासाठी आलेल्या निधी येऊन वर्ष लोटले तरीदेखील शाळा मात्र कागदावर भरत असल्याचे वास्तव आहे.

मी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांच्यापुढे या दोन्ही शाळेची वस्तुस्थिती मांडली यावर शिक्षण विभाग गप्प का असा प्रश्नही विचारला यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘वेट अँड वॉच’चा सल्ला दिला.परंतु अद्याप या प्रकरणाची चौकशी लावली नाही. यातील आरोपींना पाठीशी घालण्यात आले तर गाठ गुरुदेव युवा संघाशी आहे.
– मनोज गेडाम,अध्यक्ष,गुरुदेव युवा संघ, यवतमाळ.