पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
औरंगाबाद , दि. १५ :- महानगरपालिकेच्या निवडणुकीत ‘मध्य’वर्ती भूमिका, समर्थकांची पक्षात वर्णी, मध्य मतदार संघाची बांधणी या सर्व भूमिका डोळ्यासमोर ठेवून तनवानी आस्ते कदम चालण्याचे ठरवले आहे. समर्थकांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय अशी भूमिका घेतल्याने त्यांचा शिवसेना प्रवेश लांबला. तनवाणी थांबल्याने शिवसेनेने बारबालांवर भागवले, अशी स्थिती आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यातच भाजप नेते किशनचंद तनवाणी यांच्या प्रवेशाची कच्ची पावती तयार होणार होती. मात्र कुठेतरी बिनसले अन शिवसेना नेत्यांनी गजानन बारवालांना मातोश्रीच्या दरवाजात नेले. महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना बडा धमाका करण्याच्या मूडमध्ये आहे. गेल्या महिनाभरापासून स्थानिक नेत्यांनी तशी तयारीही केली होती.
१३ फेब्रुवारी रोजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे अन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या दौऱ्यात शहरातील काही प्रमुख नेत्यांच्या प्रवेशा विषयी चर्चाही होणार होती. त्याच दिवशी त्यांचा हा निरोप मातोश्री पर्यंत पोहोचवल्या जाणार होता. शिवसेना नेते खासगीत असा दावाही करीत होते. मात्र कुठेतरी माशी शिंकली अन तनवाणी यांच्यासह काही नगरसेवकांचा प्रवेश रखडला. देसाईंनी चर्चेसाठी मातोश्रीवर या असा निरोप ठेवून मुंबईकडे प्रयाण केले. त्यानंतर गजानन बारवाल आणि इतरांची तजवीज स्थानिक नेत्यांनी केली. त्यांना तातडीने मातोश्रीवर नेण्यात आले. त्याचवेळी पुढील प्रवेशाची यादी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे समजते. येत्या काही दिवसात थेट मातोश्रीवर जाऊनच प्रवेश करण्याची तयारी नेत्यांनी केली आहे.
तनवाणीची सेटिंग !
दरम्यान किशनचंद तनवाणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे समजते. त्यामुळे त्यांना स्थानिक नेत्यांमार्फत मातोश्रीवर जाण्याची गरज उरलेली नाही. तनवानी पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असल्याने महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, याची जाणीवही पक्षप्रमुखांना आहे. या निवडणुकीत सेनेकडून महत्त्वाची भूमिका तनवाणी यांना बजावायची आहे. दुसरीकडे मध्य मतदारसंघात बांधणीही ते यानिमित्ताने करणार आहेत. ही सर्व जुळवाजुळव झाली की त्यानंतरच तनवाणी मातोश्रीच्या दारात जातील, असे बोलले जाते. आपल्या समर्थकांशी चर्चा करण्यासाठी त्यांनी वेळ मागितल्याचेही समजते. एकंदरीत घाईघाईत निर्णय घेण्यापेक्षा समर्थकांशी चर्चा करूनच त्यांनी निर्णय घेण्याचे ठरविल्याने शिवसेनेचा नाईलाज झाला. म्हणूनच तनवाणी थांबले अन शिवसेनेने बारवालांवर भागवले, अशी सध्याची परिस्थिती आहे.
Post Views: 261