Home मुंबई आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून माहिती विभागाने अद्यावत व्हावे – डॉ. दिलीप पांढरपट्टे

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून माहिती विभागाने अद्यावत व्हावे – डॉ. दिलीप पांढरपट्टे

166

कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने कार्यशाळेचे आयोजन…!

नवी मुंबई , दि. २६ :- माहितीच्या क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. आज कॅमेरा युगाचा अस्त होत असुन मोबाईल युग सुरु झाले आहे.ही एक नवीन क्रांती असुन या बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामकाजात करुन माहिती विभागाने अद्ययावत व्हावे असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ दिलीप पांढरपट्टे यांनी केले.
कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने कोकण भवन येथे मराठी भाषादिनाचे औचित्य साधुन आयोजित ‘मोबाईल पत्रकारिता’ या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन महासंचालक डॉ दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उपसंचालक डॉ गणेश मुळे, ज्येष्ठ पत्रकार सुनिल ढेपे, वरिष्ठ पत्रकार हर्षल भदाणे उपस्थित होते.
यावेळी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, काळाची पाउले ओळखुन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तंत्रज्ञानाचा दैनंदिन कामकाजात वापर करीत आहे. सध्याचे मोबाईलचे युग आहे. मोबाईल पत्रकारितेचे महत्त्व लक्षात घेऊन कोकण विभागीय कार्यालयाने यासाठी घेतलेला पुढाकार अतिशय अभिमानास्पद आहे.
मोबाईल हा माहिती विभागाचा साथी बनला आहे. जिल्हास्तरावर अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात यावे. आगामी काळात माहिती महासंचालनालय आधिक सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री. पांढरपट्टे यांनी यावेळी केले.
उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी प्रास्तविकामध्ये कार्यशाळा आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. मोबाईल पत्रकारीतेचा वापर कसा करायचा, त्याचे फायदे आहे आणि भविष्यात ‘मोजो’ किती गरजेचा आहे याबाबत माहिती दिली.
‘मोबाईल पत्रकारिता’ या विषयावर मार्गदर्शन करताना वरिष्ठ पत्रकार, हर्षल भदाणे यांनी विविध मोबाईल अँपची माहिती देऊन प्रशिक्षण दिले. तसेच उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींकडून प्रात्यक्षिक करुन घेतले.
पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे, यांनी डिजिटल मीडिया आणि नवे बदल या विषयावर मार्गदर्शन केले.
संगणकात मराठीचा वापर याविषयावर विभागीय सचिव जयंत भगत आणि नटराज कटकधोंड यांनी मार्गदर्शन केले. जागतिकरणाच्या जमान्यात संगणकाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या वापराबाबत अनेक ॲपच्या वापराबाबत माहिती दिली.
या कार्यशाळेस सहसंचालक लेखा कोषागारे सिताराम काळे, आरोग्य अधिकारी डॉ गणेश धुमाळ यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे सुत्रसंचालन ठाण्याच्या जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन माहिती अधिकारी राहुल भालेराव यांनी केले.
कार्यशाळेस कोकण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.