Home सोलापुर सुपली येथील पुलाचे काम केवळ अठरा दिवसांत पूर्ण , राज्य रस्ते विकास...

सुपली येथील पुलाचे काम केवळ अठरा दिवसांत पूर्ण , राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुलाच्या उभारणीचा गतिमान प्रयोग

185

राजेश भांगे

सोलापूर – कोसळलेला पुल अवघ्या अठरा दिवसांत पुन्हा उभा करण्याची किमया राज्य रस्ते विकास महामंडळाकडून साधली गेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सुपली येथील पूल अठरा दिवसांत उभा करण्यात आला असून येत्या १५ मार्चपासून या पुलावरून वाहतूक सुरू केली जाईल, असे महामंडळाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले यांनी सांगितले.


राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ – ई वरील सुपली गावाजवळ उजनी उजव्या कालव्यावरील जुना पुल ९ फेब्रुवारी २०२० रोजी कोसळला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नवीन पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले. दोन दिवसांत कालव्यात दहा मीटर रुंदीत भराव टाकून ११ फेब्रुवारीला वाहतूक सुरु ठेवण्यात आली.
११ फेब्रुवारीला सुरु करण्यात आलेले पुलाचे काम २८ फेब्रुवारीला पूर्ण करण्यात आले आहे. कालव्यात उन्हाळी आर्वतनाचे पाणी ७ मार्च रोजी येणार होते. त्यामुळे त्यापूर्वी पुलाचे काम पुर्ण करण्याचे आव्हान होते. आव्हान स्विकारुन सार्वजनिक बांधकाम, रस्ते महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच १८ दिवसांत पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे, असे भोसले यांनी सांगितले.
पुलाचे संकल्पन एम ३५ ग्रेडच्या काँक्रीटचे केले होते. मात्र पुलाचे बांधकाम गतीने करावयाचे असल्याने उच्च एम ४० / एम ४५ ग्रेडच्या काँक्रीटचा वापर केला आहे. काँक्रीटचे सेटींग लवकर होणेसाठी ॲड मिक्शरचा (BASF) वापर करण्यात आला आहे. क्युरिंगसाठी क्युरिंग कंपाऊंडचा Molecule (Aluminize Based) वापर करण्यात आल्याचे भोसले यांनी सांगितले.
१४ दिवसांच्या क्युरिंग कालावधी दरम्यान जोड रस्त्याचे काम पूर्ण करुन १५ मार्चपासून पुलावरुन वाहतूक सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुलाचे काम पुर्ण करताना रस्ते विकास महामंडळ, महसूल व पोलीस प्रशासन यांच्यामध्ये उत्कृष्ट समन्वय असल्याने पुलाचे काम करणे शक्य झाले, असेही भोसले यांनी सांगितले. या कामकाजात महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आणि अधीक्षक अभियंता आबासाहेब नागरगोजे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे भासले यांनी सांगितले.
*पुलाची ठळक वैशिष्ठे*
• पुलाची गाळे रचना – १० मीटरचे दोन गाळे
• पुलाची लांबी – २० मीटर
• पुलाची रुंदी – १६ मीटर
• पुलाची उंची – ५.५ मीटर
• पुलाचे संकल्पन – आर सी सी पोर्टल फ्रेम.
• पुलासाठी काँक्रीटचा वापर – १३६ मे टन (२७२० सिमेंट बॅग)
• पुलासाठी लागलेले स्टील – ४१ मे. टन
• प्रत्यक्ष कामावर काम करणारे मजूर – ८१ (तीन शिफ्टमध्ये)
• पुलावर प्रत्यक्ष काम करणारे अभियंते – १२
• पुलाचे काम करणारी कंपनी – रोडवे सोल्युशन इंडिया लि. पुणे.
• अथोरिटी इंजिनिअर – स्टुप कन्सलटन्सी, मुंबई.