अमीन शाह
सिंदखेडराजा ,
इस्लाम धर्मामध्ये रमजान महिन्याचे विशेष महत्त्व आहे. रमजान महिन्यात पवित्र कुरआन चे पठण करून ३० दिवस रोजा (उपवास) करत अल्लाहचे स्मरण केले जाते. रोजा सुरू होण्यापूर्वी व समाप्तीनंतर ‘अजान’चे महत्त्व इस्लाम धर्मामध्ये अधोरेखित करण्यात आलेले आहे. त्यामुळे सकाळी रोजा सुरू होताना व सायंकाळी रोजा सोडवता प्रशासनाने अजानची मुभा देण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे कार्ध्याध्यक्ष इरफानअली शेख यांनी केली आहे.
तालुक्याची शांतता समितीची सभा पंचायत समिती सभागृह सिंदखेडराजा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या सभेमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना व अंमलबजावणीसाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. यावेळी इफानअली शेख यांनी हि मागणी केली. या सभेमध्ये पोलिस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय अधिकारी डॉ.विवेक काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नलावडे, रा.कॉ. जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, माजी आमदार तोताराम कायंदे, भाजपा युवा मोर्चाचे सचिव विनोद वाघ, पं.स.सभापती विलासराव देशमुख, सिंदखेडराजाचे नगराध्यक्ष सतीश तायडे, शिवाजीराजे जाधव, तहसीलदार डॉ.संतोष येवलीकर, सिंदखेड राजाचे ठाणेदार सातव, किनगावराजाचे ठाणेदार सोमनाथ पवार, नगरपालिका मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना इरफानअली शेख म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात मशिदीमध्ये नमाज अदा न करता समाज बांधवानी घरिच नमाज पठण करत शासन निर्देशाचे काटेकोर पालन केले व यापुढेही करण्यात येईल. दि.२४ एप्रिल पासून मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याची सुरूवात होत आहे. यामध्ये रोजे ठेवताना अजान’चे विशेष महत्त्व आहे. सकाळी ४ वाजता सहेरीच्या वेळी व संध्याकाळी ७ वाजता इफ्तारिच्या वेळी घरीच “अजान” ऐकुन मुस्लिम बांधवांना रोजा ठेवण्याची व सोडवण्याची प्रक्रिया पुर्ण करता यावी. तसेच अजान ऐकुन घरीच नमाज अदा करण्यास मदत होईल. यासाठी सकाळी व संध्याकाळी अंजान देण्यास मुभा देण्यात यावी. दरम्यान अँड.नाझेर काझी यांनी पालकमंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या सक्षम नेतृत्वात प्रशासन अतिउत्कृष्ट कामगिरी करत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी घरिच नमाज पठण करत रोजे ठेवावे. त्यासाठी प्रशासनाने सहेरी व इफ्तारिच्या वेळी अजान ची सुट द्यावी असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढील बैठकीत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन सभेमध्ये दिले.