मायणीतील देशी दारूचे दुकान फोडले
लाखोंची दारू लंपास
मायणी – सतीश डोंगरे
सातारा – येथील मायणी- वडूज रोडवर मुख्य चौकालगत असलेल्या सुरेश घोणे यांच्या देशी दारूच्या दुकानातील 57 दारू बॉक्समधील एक लाख 42 हजार 782 रुपयांची दारू तळिरामांनी चोरून नेली. याबाबत मायणी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद नोंदवण्यात आली.
याबाबत कोरेगाव दारूबंदी उत्पादन शुल्क व दुकान मालक यांनी दिलेल्या माहितीनुसार मायणीच्या मुख्य चौकात सुरेश घोणे यांचे दुकान दुय्यम निरीक्षक दारूबंदी व उत्पादन शुल्क कोरेगाव यांनी ता. 21 मार्च रोजी सील केले होते. त्यानंतर मायणी व परिसरातील तळिरामांची गोची झाली होती. अखेर दारूची तलफ भागविण्यासाठी चोरट्यानी लॉकडाउनमध्ये दारूचे दुकान फोडून अनलॉक केले. रात्री मायणीत पहारा देणाऱ्या गुरखामार्फत पोलिस पाटील यांना घोणे यांच्या दुकानात चोरी झाल्याचे समजले. त्यानंतर पोलिस पाटील यांना चोरटे दिसूनही आले. त्यांचा पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे दोन दुचाकीवर पलायन करण्यात यशस्वी झाले. त्यानंतर दुकान मालक घोणे यांनी दुकानात हजेरी लावल्यानंतर चोरट्यांनी दुकानातील छताचा पत्रा उचकटून व शिडीच्या मदतीने दुकानात प्रवेश केला.
त्यानंतर दुकानातील एकूण 57 बॉक्स चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यात 750 मिलीच्या 46 हजार 764 रुपयांच्या 216 बाटल्या, 180 मिलीच्या 90 हजार 740 रुपयांच्या 1745 बाटल्या व 90 मिलीच्या पाच हजार 278 रुपयांच्या 203 बाटल्या असा एकूण एक लाख 42 हजार 782 रुपयांचा माल पळवून नेल्याची माहिती महेश गायकवाड दुय्यम निरीक्षक दारूबंदी व उत्पादन शुल्क कोरेगाव यांनी दिली. सदर घटनेची फिर्याद रात्री उशिरा दुकानंमालक यांनी नोंदवली आहे.