मृत आळंद येथील – अक्कलकोट तालुक्यातील घटना…
वागदरी / नागप्पा आष्टगी
अक्कलकोट – शिरवळ गावा जवळ चालकाचा ताबा सुटल्याने तांदूळ वाहतूक करणारा मालवाहू ट्रक ( क्रमांक KA 32 B 2123 ) उलटून ट्रकचा क्लिनर बसवराज हणमंत मंठाळे (वय 42 रा. सुलतानपूर गल्ली,आळंद ) हा जागीच ठार झाला.तर चालक मोहम्मद शफीक गफूर मुजावर ( वय 40 रा. बंगडीपीर गल्ली आळंद ) हा किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता अक्कलकोट – आळंद रोडवरील शिरवळ हद्दीत श्री पंचलिंगेश्वर मंदिराजवळ घडली. लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा भासत आहे. याला अनुसरून रायचूर ( कर्नाटक ) ते मुंबई तांदूळ घेऊन जात होते. शिरवळवाडी झाल्यानंतर शिरवळ कडे जात असताना हाकेच्या अंतरावर अपघाती वळण आहे. पूर्ण मालवाहू ट्रक भरून तांदळाच्या गोण्या होत्या. चालकाचा अचानक ताबा सुटला आणि ट्रक थेट रस्ता सोडून डाव्या बाजूच्या खड्यात जाऊन पलटी झाली. ट्रकचा खालचा पार्श्वभाग वर झाला त्यामुळे ट्रकमधील तांदळाच्या गोण्या बाहेर पडल्या. ट्रकचा समोरचा भाग व केबिन चक्काचूर झाला होता त्यामुळे क्लिनर बसवराज हणमंत मंठाळे हा आतच अडकला त्याला बाहेर पडायला संधी न मिळाल्याने जागेवरच ठार झाला. तर चालक मोहम्मद शफीक गफूर मुजावर हा कसाबसा बाहेर पडला त्याला किरकोळ मार लागल्याने तात्काळ अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात झाली असून घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड व पोलीस हवालदार अरुण राऊत पोलिस कॉन्स्टेबल अंकुश राठोड उपस्थित होते.