समीर अहेमद शेख
अकोला , दि. ११ :- अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या भागात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता आज सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी संयुक्तरित्या अकोला शहरातील बैदपुरा व खैर मोहम्मद प्लॉट या भागांची पाहणी केली. यावेळी क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, विठ्ठल देवकते, आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर व आरोग्य निरीक्षकांची उपस्थिती होती. यावेळी बैदपुरा व खैर मोहम्मद प्लॉट येथे नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले. येथील सर्व बंद केलेल्या मार्गांची पाहणी करुन प्रतिबंधित प्रवेश मार्गांच्या व्यवस्थांचे अवलोकन केले. या प्रतिबंधित क्षेत्रात करण्यात येत असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्था व आरोग्य तपासणी सुविधांचीही पाहणी करुन त्यांनी आढावा घेतला. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरी राहून सुरक्षित रहावे असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले.