Home विदर्भ गृह विलगीकरण कुंटूबातील व्यक्ती घराबाहेर पडल्यास 10 हजार रुपयाचा दंड – जिल्हाधिकारी...

गृह विलगीकरण कुंटूबातील व्यक्ती घराबाहेर पडल्यास 10 हजार रुपयाचा दंड – जिल्हाधिकारी यांचे आदेश

154

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. 18 :- इतर जिल्हयातून वर्धा जिल्हयात मोठया प्रमाणात लोकांचा प्रवेश होत आहे. या कोरोना बाधित जिल्हयातून येणा-या व्यक्तीना गृह विलगीकरण व संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. परंतु गृहविलगीकरणात असलेल्या व्यक्ती या काळात विलगीकरणाचे नियम तोडून बाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांच्यावर व कुटुंबावर 10 हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आज दिले आहेत.
जिल्ह्यात मागील सात दिवसात सात हजार व्यक्ती इतर जिल्ह्यातून आलेल्या आहेत. या सर्वांना त्यांच्या सोयीनुसार कुटुंबासाहित गृह विलगीकरणात ठेवलेले आहे. मात्र अनेकदा नियमांचे उल्लंघन केल्याने काही व्यक्तींवर गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत. यापूर्वी विना परवानगी जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींवर 2 हजार रुपये दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले होते.

आता जिल्ह्यात बाहेरून येणाऱयांच्या संख्येत रोज वाढ होत असून यांच्यामुळे जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या वाढण्याची शक्यता बघता गृह विलगिकरणाचे नियम मोडणाऱ्या व्यक्ती व त्यांचे कुटुंब यांच्यावर 10 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे कडक पाऊल जिल्हाधिकारी यांनी उचलले आहे. कोणतीही व्यक्ती विलगीकरण काळात घराबाहेर पडल्याचे आढळल्यास 10 हजार रुपये दंड तसेच त्यांचे विरुध्द कायद्याअंतर्गत आवश्यक फौजदारी कारवाई करण्यात येईल. दुस-या जिल्हयामधून सक्षम प्राधिका-याची परवाणगी न घेता अनधिकृतपणे वर्धा जिल्हयात प्रवेश करणा-यांवर 2 हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
सदर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार महसूल , पोलिस, ग्रामसेवक, आरोग्य विभाग, नगर पालिका व सहकार विभागांना देण्यात आले असल्याचे श्री भीमनवार यांनी आदेशात नमूद केले आहे.