सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
शोध व बचाव पथकातील स्वयंसेवकाना केले प्रशिक्षित…!
वर्धा, दि.3 :- मान्सून तोंडांवर आलेला असताना जिल्ह्यात शोध व बचाव पथकातील स्वयंसेवकांना महाकाळी धरणावर पूर परिस्थितीमध्ये कसे काम करायचे याबाबत राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने प्रशिक्षण दिले.
स्वत:चे जीवन सुरक्षित करून दुसऱ्यांचे जीवन कसे वाचविता येईल, त्याकरिता आवश्यक असणारे बचाव साहित्य स्थानिक पातळीवर कशाप्रकारे उपलब्ध करावे याबाबत माहिती दिली. आपत्ती निवारणामध्ये स्वयंसेवकांची भूमिका व जबाबदारी याबाबत सांगून, कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमध्ये घाबरून न जाता आलेल्या परिस्थितीमधून सुखरुप बाहेर पडण्याकरीता आवश्यक ती खबरदारी घेऊन, स्वत:कडे असणारी जबाबदारी पार पाडावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर सोनटक्के यांनी केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, वर्धा य राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने धाम प्रकल्प, महाकाळी धरण येथे, मान्सुन पूर्व तयारीचे अनुषंगाने एक दिवसाचे प्रशिक्षण घेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसींगचे सर्व नियमाचे पालन करण्यात आले. सदर प्रशिक्षणामध्ये जिल्हा शोध व बचाव पथक सदस्य , अशासकीय संस्था, स्वयंसेविका व स्वयंसेवक उपस्थित होते.
प्रशिक्षणामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नागपूरचे पोलीस निरीक्षक ललीत मिश्रा, पोलीस उपनिरीक्षक राधेलाल मडावी यांचे नेतृत्वामध्ये त्यांचे पथक सदस्य डी.डी.ठाकरे, एस. डी. बोधलकर, एस.एल.चकोले, ए. के. तिवारी, एस. एन. गोमाटे, व्ही. आर. तिवारी, टी. पी. देशपांडे, जी. डी .जाधव व आर. एम. पाटिल यांनी उपस्थितांना पुर परिस्थितीमध्ये बचाव करण्याबाबत प्रात्याक्षिकाव्दारे प्रशिक्षण दिले. यावेळी शोध व बचाव पथकातील सुमारे 50 व्यक्ती उपस्थित होत्या.