विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे
मलापुरम / केरळ – सायलेंट वॅली मधुन एक हत्तीण पलक्कड जिल्ह्यात येते. ती भुकेने व्याकुळ असेल ती खाण्याच्या शोधात असतांनाच तिला कुणीतरी असामाजिक घटक स्पोटकांनी भरलेला अननस खाऊ घालतो.
तोंड आणि जीभ फाटलेल्या अवस्थेत ती आजुबाजुच्या कुठल्याही माणसाला, इमारतीला इजा न करता पाण्याच्या शोधार्थ चालत राहते.
चालत राहते.
चालत राहते.
ती वेल्लियार नदीच्या मधोमध जाऊन निश्चल उभी राहते. तिला मदत करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी मोहन हे निलकांथन आणि सुरेंद्रन, दोन हत्ती आणतात. जेणेकरुन ते तिला पाण्यातुन बाहेर येण्याचा मार्ग दाखवतील.
सहसा अशा मार्गाने पुरात अडकलेले हत्ती वाचवले जातात. आणि कदाचित माणसांवर तिचा विश्वासही राहिला नसेलच. लहानपणीच्या एका भेटीवर हा प्राणी नंतर कितेक वर्षानी तुम्हाला आोळखु शकतो. तिथे काही तासापुर्वी अननस देण्यासाठी प्रेमाने चुचकारलेल्या माणसांचा तो चुचकारा तिच्या अजस्त्र कानात ताजा असेलच.
ती नदीबाहेर येत नाही. तिला काहीतरी कळालं असावं. किंवा धक्क्यातुन ती सावरलेली नाहीए. ती हलत नाही.
ती नदीत तोंड खुपसुन ती तशीच स्तब्ध उभी असते.
वनविभागाच्या अनेक प्रयत्नानंतरही ती वाहत्या वेल्लियार नदीच्या खळखळत्या पाण्यात तिथेच सायंकाळी चार वाजता उभ्या उभ्या आपले प्राण सोडते, ती जलसमाधी घेते.
पोस्टमोर्टमनंतर डॉक्टर म्हणतात ‘ती एकटी नव्हती’. ती गर्भवती असते. एवढा मोठा प्राणी आपली भूक सहन करु शकतो पण कदाचित ती पोटातल्या जीवासाठी ती सायलेंट वॅलीतुन बाहेर पडलेली असते.
संशोधकांच्यामते, हत्ती आपल्या कळपातलं कुणी वारलं तर त्यांवर अंतिमसंस्कार करतात. नंतर सगळे स्मृतिस्थळी भेटी देऊन शोकही व्यक्त करतात. त्यांच्या मेंदूची जडणघडण ही मनुष्यासारखी असल्याने मनुष्यासारख्यांच त्यांना भावभावना-स्मृती असतात. हे आत्ता घडलं,सत्तावीस मे दोनहजारवीसला. वनअधिकारी मोहन कृष्णन यांनी ‘माफ कर बहिणी,माफ कर’ अशी सुरवात करुन हा प्रसंग जगाला सांगितलय.