निखील मोर
पाचोरा – जळगांवचे भारतीय जनता पार्टीचे खासदार उन्मेष पाटील व पाचोरा – भडगांव येथील स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी जन आक्रोश करित जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना शेतकऱ्यांच्या हितार्थ निवेदन देवुन शेतकऱ्यांचीच दिशाभुल केली आहे. हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असुन त्यांचेच अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहे. कापुस खरेदी केंद्र (सी.सी.आय.) हे केंद्र शासनाच्या अधिन आहे. पिक विमाही पंतप्रधान पिक विमा असा आहे व तोही केंद्रांशी संलग्न आहे जिल्हा बँक ही केवळ एक एजन्सी म्हणुन कार्यरत आहे. भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनातील मागण्या ह्या केंद्र शासनाशी व राज्यात भाजपाची सत्ता असलेल्या संस्थांशी निगडित आहे. खासदार उन्मेष पाटील हे केवळ पाचोरा – भडगांव चे खासदार नसुन जिल्ह्याचे खासदार आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या प्रेमापोटी शेतकऱ्यांची दिशाभुल त्यांनी थांबवावी. अशी माहिती पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी त्यांचे निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते.खासदार उन्मेष पाटील व स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी दि. ७ रोजी जिल्हाधिकारी यांना २० हजार शेतकऱ्यांच्या सह्या असलेले निवेदन दिले. कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपाची सत्ता आहे. या समितीत ६ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. ही नोंदणी संशयास्पद असल्याचे पंचनाम्याअंती सिध्द झाले. पाचोरा तालुक्यातील ३ हजार २४६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच मका व ज्वारी पिकांसाठी १८५५ शेतकऱ्यांनी नोंदणी असुन भडगाव तालुक्यातील २ हजार ३०० शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे. मात्र खासदार उन्मेष पाटील व पाचोरा – भडगांव चे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चक्क २० हजार शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे. स्वत:चेच अपयश झाकण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. खासदारांनी व स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची दिशाभुल करण्याचे थांबवावे. संपुर्ण देश हा कोरोना विषाणुचा सामना करत असतांनाच भाजपा पदाधिकारी शेतकऱ्यांची दिशाभुल करण्यात व्यस्त आहेत. अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.