पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
यवतमाळ , दि. ३ :- माहिती व तंत्रज्ञानाच्या या युगात युवक-युवतींमध्ये सोशल मीडियाचे प्रचंड आकर्षण आहे.या माध्यमातून प्रत्येक जण अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करतो.अभिव्यक्त होणे हा अधिकार असला तरी आपल्या एखाद्या पोस्टमुळे समाजाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.जबाबदारीचे भान ठेवूनच नागरिकांनी सोशल मीडिया वापरावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक मेघनादन राजकुमार यांनी केले.
शहरातील डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम अभ्यासिकेत जिल्हा माहिती कार्यालय व पोलिस विभाग सायबर सेलच्या वतीने आयोजित‘सायबर सेफ वुमेन’या कार्यशाळेत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.यावेळी मंचावर पोलिस निरीक्षक सर्वश्री धनंजय सायरे,अनिल किनगे,मार्गदर्शक रम्या कन्नन राजकुमार,सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पुरी,महिला सेलच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक विजया पंधरे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने आदी उपस्थित होते.सोशल मीडियावर आपण जे काही व्यक्त होतो किंवा अपलोड करतो ते सर्व योग्यच आहे असा भ्रम बहुतांश लोकांना असतो असे सांगुन श्री.राजकुमार म्हणाले,युवक वर्गामध्ये मोबाईल आणि बाईकचे आकर्षण आहे.
दोन्ही गोष्टी जपुनच वापराव्या लागतात. या वस्तु जेवढ्या उपयोगी आहेत तेवढ्याच घातकसुध्दा.सध्या सेल्फि काढण्याकडे नागरिकांचा कल दिसतो. त्यामुळेच कंपन्यांनी मोबाईलचा फ्रंट कॅमेरा २५ मेगॅपिक्सलपर्यंत काढला आहे. यावरून नागरिकांच्या आवडीनिवडी, चेह-यावरचे हावभाव कंपन्यांच्या लक्षात येते. त्याचा फायदा घेऊन या कंपन्या मार्केटिंग करतात. डीजीटल प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध होणा-या गोष्टींमध्ये नक्कीच काहितरी गडबड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही समाजकंटक अशा माध्यमातून गैरप्रकार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.अशावेळेस आपली सद्सदविवेकबुध्दी वापरून आपल्या डिवाईसवरून किंवा डाटावरून काही गैरप्रकार तर होत नाही ना, याची काळजी नागरिकांनी घ्यावी.सोशल मीडिया वापरतांना आपली जबाबदारी काय, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे.आपण वापरलेल्या डीजीटल फुटप्रिंट पोलिसांकडे लवकर उपलब्ध होतात.सायबर गुन्हे उघडकीस आणणे कठीण राहिले नाही. तुमचा डाटा सर्वकाही सांगतो.
तो नष्ट होत नाही.त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल किंवा एखाद्याच्या भावना दुखावतील अशा पोस्ट नागरिकांनी करू नये, असे आवाहन पोलिस अधिक्षकांनी केले. यावेळी त्यांनी सायबर गुन्ह्यांबाबत विविध उदाहरणे दिली.उपस्थितांना मार्गदर्शन करतांना रम्या कन्नन म्हणाल्या,१५ वर्षांपूर्वी शाळा-महाविद्यालयात व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन व्हायचे.आज आपल्याला तंत्रज्ञानाचे विशेषकरून सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे.त्यामुळे अशा उपक्रमाच्या माध्यमातून सोशल मिडीयासंदर्भात नागरिकांची जबाबदारी यावर मार्गदर्शन होणे काळाची गरज आहे.आपली मानसिकता आज आपण मोबाईलसोबत जोडली आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग सकारात्मक गरजेसाठी झाला पाहिजे नाहीतर त्यापासून विध्वंस होऊ शकतो असे त्या म्हणाल्या. यावेळी ‘सायबर सेफ वुमेन’ या विषयावर सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पुरी यांनी तर ‘महिला सुरक्षा व कायदे’ या विषयावर विजया पंधरे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी केले. संचालन जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने यांनी केले.कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सायली देवस्थळे,नारी रक्षा समितीच्या मनिषाताई तिरणकर,विनोद दोंदल,सुकांत वंजारी,रेखा गुरव,प्रिया उमरे,स्वाती राठोड यांच्यासह जिल्हा ग्रंथालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.