मजहर शेख
नांदेड / किनवट , दि. १८ : – किनवट तालुक्यात आज 18 जुलै रोजी प्राप्त अहवालानुसार 2 व्यक्ती बाधित आढळले आहेत. त्यामुळे व्ही.आय.पी. रोड परिसर कंटेन्मेंट झोन व एस.व्ही.एम. कॉलनी बफर झोन जाहीर करण्यात येत आहे. तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि घराबाहेर पडू नये आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जाहीर केलेल्या ब्रेक द चैन अंतर्गत बाबींचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन उप विभागीय अधिकारी महेश वडदकर यांनी केले.
पूर्वीच घोषीत क्षेत्र सिध्दार्थनगर येथील 1 व नवीन 1 बाधित आढळल्याने उप विभाग किनवटचे उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर महेश वडदकर यांनी किनवट नगरपालिका हद्दीतील व्ही.आय.पी. रोड परिसर कंटेन्मेंट व एस.व्ही.एम. कॉलनी परिसर बफर झोन घोषीत केला आहे. या संपुर्ण परीसरात कलम १४४ लागु करण्यात आले आहे . या हद्दीमध्ये कुणीही प्रवेश करणार नाही अथवा बाहेर जाणार नाही, संचारबंदी लागू राहील . तसेच येथील दुकाने पुर्णपणे बंद राहतील . तसेच उपरोक्त प्रमाणे घोषीत केलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये या रोगाचा प्रसार रोखण्यासंबंधाने विविध उपाययोजना व नियोजन संबंधित विभागाने केल आहे. अत्यावश्यक सेवा जसे किराणा साहित्य व भाजीपाला , दवाखाना / मेडीकल यांची आवश्यकता असल्यास पालिका/ आरोग्य यंत्रणेमार्फत त्याचा पुरवठा मागणी प्रमाणे सशुल्क करण्यात येईल , कंटेन्मेंट झोन मधील सर्व घरांचे सर्वेक्षण निर्धारीत वेळेत पुर्ण करणेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी वैद्यकीय पथक गठीत केले आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेव्दारे उपरोक्त परीसराची संपुर्ण स्वच्छता करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
कंटेन्मेंट झोनची तहसिलदार उत्तम कागणे, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, पोलिस निरिक्षक मारोती थोरात, सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार कांबळे, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.
दि. 17 जुलैला 4 व्यक्तिंचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज प्राप्त अहवालापैकी 2 निगेटिव्ह व 2 अहवाल बाधित आले आहेत. नवीन बाधितांमध्ये सिध्दार्थनगर येथील 65 वर्षाचा 1 व व्ही.आय.पी. रोड, एस.व्ही.एम. कॉलनी परिसर येथील 48 वर्षाचा 1 पुरुष यांचा समावेश आहे. या दोघांनाही डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे भरती केले आहे. येथे 50 वर्षे वयाची 1 महिला व कोविड केअर सेंटर, किनवट येथे 38 वर्षे वयाचा 1 पुरुष दाखल आहे. चौघांवरही औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
तालुक्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे –
घेतलेले स्वॅब- 132,
निगेटिव्ह स्वॅब- 110,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 2
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 7,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 16,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1,
मृत्यू संख्या- निरंक,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 3,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 4,
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात भिती न बाळगता सभोवती कोरोना रुग्ण असल्यास सतर्क करणारे आरोग्य सेतू ऍप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे यांनी केले आहे.