शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मानवतेचा परिचय…!
यवतमाळ , दि. 3 :- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी जिल्हा प्रशासनासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा तेवढयाच क्षमतेने लढत आहे. भरती असलेल्या रुग्णाला कोरोनामुक्त करणे, हे एकच ध्येय आरोग्य यंत्रणेने ठेवले आहे. एवढेच नाही तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासोबतच रुग्णांसोबत असलेले ऋणानुबंध जपण्यावर भर दिला जात आहे. येथे भरती असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना रक्षाबंधननिमित्त राख्या बांधून येथील नर्स स्टॉफने मानवतेचा परिचय दिला आहे.
गत सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय व ग्रामस्तरावरील सर्व यंत्रणा) रुग्णसेवेत स्वत:ला झोकून दिले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होणा-या प्रत्येक व्यक्तिचा जीव वाचला पाहिजे, यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. तसेच भरती असलेला प्रत्येक जण कोरोनामुक्त झाला पाहिजे, असाच त्यांचा मानस आहे. यात सण, उत्सवाची पर्वा न करता निरंतर सेवा सुरु आहे. घरी सण साजरा न करता येथील कोरोनाबाधित रुग्णांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याचा निर्णय येथील संपूर्ण नर्सने घेतला. त्यानुसार पीपीई किट घालून येथे भरती असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना या नर्सने राख्या बांधून अनोखी भेट दिली. यावेळी सर्व नर्सने आस्थेवाईपने रुग्णांची विचारपूस करून त्यांच्या हातावर राखी बांधली तसेच रुग्णांचे आशिर्वादसुध्दा घेतले.