रजनीकांत पाटिल
अमळनेर – सध्या देशात कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून सर्व सण,उत्सव साध्या पध्दतीने साजरे करणे बाबत शासनाकडुन वेळोवेळी निर्णय घेण्यात आलेले आहेत. येत्या दि.२२ऑगस्टपासून साजरा करण्यात येत असलेला गणेशोत्सव यावर्षी सार्वजनिक मंडळांनी कोरोनामुळे साधेपणाने साजरा करावा अशा मार्गदर्शक सुचना शासनाने दिल्या आहेत. त्यासंदर्भात दिलेल्या सुचनांचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन जिल्ह्याचे सहा.पोलीस अधिक्षक सचिन गोरे यांनी अमळनेर येथे केले.
अमळनेर येथे गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते,मुर्तीकार,बॅड,डीजे मालक आदींची बैठक पोलीस विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी श्री गोरे व अधिकारी वर्ग यांची उपस्थिती होती.
श्री गोरे यांनी दिली मार्गदर्शक सुचनांची माहिती
यावेळी बोलतांना सहा.पोलीस अधिक्षक सचिन गोरे म्हणाले की, आपण मुर्तीकार,गणपतीमंडळाचे कार्यकर्ते,डि.जे., ढोल ताशा पथकाचे मालक आहात. शासनाने श्री गणेशोत्सव सण २०२० साठी मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत.त्यानुसार श्रीगणेशाचे आगमन व विसर्जन मिरवणुक काढता येणार नाही. तसेच ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर केवळ आरतीसाठीच करावा असे सुचित केलेले आहे. सध्या कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता श्री गणेशोत्सव व मोहरम सणानिमीत्त मिरवणुका काढता येणार नसल्यामुळे आपणास आपले वाद्य बॅड,डि.जे.,ढोल ताशा वाजविण्यास मनाई करण्यात येत आहे.आरती झाल्या नंतर प्रसाद वाटण्यास मनाई आहे तर आरती ही ४ ते ५ लोकांमध्येच करण्यात यावी. अथवा आरती ही ऑनलाइन किंवा फेसबुक लाईव्ह पध्दतीने भाविकांपर्यंत पोहचवावी.गणेश विसर्जन झाल्यानंतर भंडारा ठेवता येणार नाही.
मुर्तीकार व गणेश मंडळ पदाधिकारी यांनी श्री गणेशाच्या मुर्तीबाबत शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मुर्तीची उंची ही ४ फुटाच्या वर राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्हाधिकारी जळगांव यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन संपुर्ण जळगांव जिल्ह्यात मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) अन्वये खबरदारीचे उपाय म्हणुन नागरीकांना एकत्र येण्यास मनाई केलेली आहे. आपण वरील सुचनांचे, अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यास तसेच वाद्य मालकांनी आपले वाद्य बँड,डि.जे./ढोल ताशा वाजवितांना आढळून आल्यास आपले विरुध्द प्रचलित कायद्यान्वये कायदेशिर कारवाई करण्यात येईल व सदरची नोटीस आपले विरुध्द पुरावा म्हणुन मा. न्यायालयात सादर करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच घरगुती मूर्ती २ फुटा पेक्षा मोठी नसावी
सर्व नियम आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करणा-या मंडळास जिल्हा स्तरावर पारितोषिक देण्यात येईल. तर कॅन्टोनमेंट झोनमधील गणेश मंडळांनी श्री गणेश प्रतिष्ठापना करू नये. मंडळाचे अध्यक्ष आपल्या घरी मूर्ती बसवू शकतात.
सॅनिटायझरचा उपयोग करणे,मास्क वाटप करणे,सोशल डिस्टनगसिंग ठेवणे,समाज उपयोगी कामे करणे,गणेशोत्सव साठी लागणारा खर्च सत्कारणी लावावा.
विसर्जनाच्या दिवशी गणेश मुर्त्या नगरपरिषद संकलित करून प्रशासन मुर्ती विसर्जित करेल. या नियमांचे सर्वांनीच पालन करावे असे आवाहन सहा.पोलीस अधिक्षक सचिन गोरे यांनी केले.
बैठकीसाठी सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, डीजे साउंड संघटनेचे अध्यक्ष, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,पो.कॉ. हितेश चिंचोरे,दिपक माळी, रवी पाटील,चाळीसगाव, पो.कॉ. प्रताप पाटील,नितीन वाल्हे, पो. कॉ. चाळीसगाव तसेच पत्रकार बंधू-भगिनी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गोपनीय अंमलदार शरद पाटील यांनी केले.