शंभर चोऱ्या करणारा एक इमानदार चोर , ? ? ? ?
पोलीस ही झाले आश्चर्यचकित ,
अमीन शाह ,
पुणे : त्याने एकट्यानेच आत्तापर्यंत 100 हून अधिक चोऱ्या केल्या. सोन्याची गुंतवणूक फायनान्स कंपन्यांत करायची, महागड्या फ्लॅटमध्ये राहायचे. काजू, बदाम, पिस्ता दणकून हाणायचा आणि पोलिसांच्या हाती लागल्यावर त्यांना चोरलेल्या मालाची शंभर टक्के “रिकव्हरी’ देऊन सहकार्याची भूमिका घ्यायची, इतका साधा-सरळ स्वभाव. त्याहीपुढे जाऊन यदा-कदाचित चोरी करताना लोकांनी पाहिले तर खुशाल दुकानाचे शटर, घराची कडी आतून लावून घ्यायची, 100 नंबरला फोन करून सांगायचे आणि लोकांच्या नाकावर टिच्चून पोलिस संरक्षणात कारागृहात जायचे. सांगा पाहिलाय कधी असा घरफोड्या चोरटा कधी ! जयड्या नाव त्याच. जयड्या ऊर्फ जयवंत गायकवाड. समर्थ पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या जयड्याला आणि त्याचा दूरचा मेव्हणा विशाल आदमाने या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. तर थोडस फ्लॅशबॅकमध्ये जाऊ. जयड्या हा पीएमपीमध्ये गाड्या दुरुस्तीची कामे करायचा. नंतर त्याने स्वतःचे गॅरेज टाकले. त्याचवेळी त्याला घरफोड्यांची चटक लागली. गडी एकटाच जाऊन घरफोड्या करायचा. 4 ते 5 घरफोड्या केल्यानंतर एखाद्या घरफोडीत त्याला थोडाफार मुद्देमाल मिळायचा. त्याने हळूहळू आपल्या घरफोड्यांचे काम वाढविले. पुण्यात आला, दिवसा बंद घरांची पाहणी करून रात्री घरफोड्या करायचा. रास्ता पेठ, नाना पेठेत चोरी केली, त्यावेळेपासून तो समर्थ पोलिसांच्या अभिलेखावर आला. मात्र पुढे सीसीटीव्ही आल्यामुळे त्याचे सूत्र बिघडले. पाच-दहा घरफोड्या केल्या, की लगेच पोलिस त्याच्यापर्यंत पोचायचे आणि उचलून घेऊन जायचे. पोलिसांकडून सतत कारवाई होत असूनही जयड्याने पोलिसांशी कधीच बेइमानी केली नाही. चोरी केलेला माल फायनान्स कंपन्या, सराफी व्यावसायिकांकडे ठेवायचा. पोलिसांनी पकडले की, सरळ त्या-त्या सराफी व्यावसायिक, फायनान्स कंपन्यांना कोणत्या वेळी किती माल दिला, त्याची किंमत किती होते इत्यादी सविस्तर माहिती तो पोलिसांना द्यायचा. साहजिकच पोलिसांनाही 100 टक्के ‘रिकव्हरी’ केल्याचा आनंद मिळायचा आणि चांगली प्रसिद्धीही व्हायची. काही दिवसांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेसह भवानी पेठ, नाना पेठेत व्यावसायिकांची दुकाने फोडल्याने फरासखाना व समर्थ पोलिस चोरट्याच्या शोध घेत होते. समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी नीलेश साबळे हे सीसीटीव्हीची पाहणी करत होते. त्याचवेळी त्यांना एका सीसीटीव्हीमध्ये जयड्या चालत जाताना दिसला. त्यावेळी जयड्या हा समर्थ पोलिसांच्या हद्दीत घरफोड्यांप्रकरणी यापूर्वी अटक केलेला आरोपी असल्याचे दिसले. त्यानंतर तो मावळ तालुक्यातील शिरगाव येथे येणार असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलिस कर्मचारी सुशील लोणकर, राजस शेख, संतोष काळे, नीलेश साबळे यांच्या पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी जयड्याने केलेल्या घरफोडीच्या घटना उघड झाल्या. पोलिसांनी त्याच्याकडून 70 ग्रॅम सोने, 500 ग्रॅम चांदी व दुचाकी असा अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
गडबड झाली तर पोलिसांना तोच फोन करायचा ,
चोरी करताना नागरिकांनी पाहिल्यानंतर ते मोठ्या संख्येने एकत्र येऊन त्यास चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्याची दाट शक्यता जयड्याला वाटते. त्यामुळे अशी घटना घडल्यानंतर तो पहिल्यांदा चोरीच्या ठिकाणच्या शटरची आतून कडी लावतो. त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षाच्या 100 क्रमांकाला फोन करून चोरीच्या घटनेची स्वतः माहिती देतो. पोलिस आल्यानंतर त्यांच्यासमवेत तो सुरक्षितरीत्या पोलिस ठाण्यात पोचतो. नागरिकांच्या मारापासून वाचविण्यासाठी त्याने लढविली ही शक्कल ऐकून पोलिसही चक्रावले आश्चर्यचकित झाले.